मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कक्ष अधिकाऱ्याची क्रेडिट कार्ड शुल्काच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
३८ वर्षीय तक्रारदार एमएमआरडीएच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांना आराध्या शर्मा नावाचा महिलेने दूरध्वनी केला. तिने आपण खासगी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तिने अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमध्ये सुरक्षा सुविधा सुरू असून त्यासाठी वर्षाला १७०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. तसेच ते बंद करायचे असल्यास तुम्हाला एक ओटीपी पाठवतो. तो तुम्ही सांगा म्हणजे ती सेवा बंद होईल. त्यामुळे तुम्हाला शुल्कही भरावे लागणार नाही, असेही तिने सांगितले. तिच्याशी बोलताना तक्रारदार अधिकाऱ्याला एका पाठोपाठ एक पाच ओटीपी आले. त्यांनी विश्वासाने ते महिलेला सांगितले. त्याचा फायदा घेत अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून जवळपास ४३ हजार रुपये काढण्यात आले.
हेही वाचा – कोळीवाड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली – पालकमंत्री दीपक केसरकर
हेही वाचा – मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ३०० चौरस मीटरच्या बांधकामांना सीआरझेड सवलत!
पैसे काढण्यात आल्याची माहिती त्यांनी शर्माला दिल्यावर ते पैसे अर्ध्या तासात पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील, असे तिने सांगितले. मात्र पैसे जमा न झाल्याने अधिकाऱ्याने महिलेला दूरध्वनी केला. त्यावेळी महिलेचा दूरध्वनी बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बीकेसी पोलिसात धाव घेतली. त्यांनी कथित आयसीआयसी अधिकारी शर्माच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच महिती तंत्रज्ञानचे सह कलम ६६ (सी),६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.