लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील आयर्लंड वकिलातीमधील अधिकार्याची सुमारे सात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक करण्यात सांताक्रुझ पोलिसांना यश आले. सुनील जगदीश गर्ग असे अटक आरोपीचे नाव असून तो सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बँक खाते उपलब्ध करण्यात मदत करीत होता. आरोपीने आतापर्यंत चार बँक खाती आरोपींना उपलब्ध केल्याचे तपासात उघड झाले आहे.
४९ वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथे वास्तव्यास असून ते आयर्लंड वाणिज्य वकिलातीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांना १७ मे रोजी मोहनकुमार नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करून कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने तैवान येथे एक पार्सल पाठविण्यात आले होते. त्यात पाच पारपत्र, तीन क्रेडिटकार्ड, दोनशे ग्रॅम एमडी अमली पदार्थ, कपडे, लॅपटॉप आणि रोख ३५ हजार रुपये होते. ते पार्सल कस्टम विभागाने जप्त केले असून त्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांना विक्रम सिंग नावाच्या गुन्हे शाखेतील एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाने दूरध्वनी केला. तुमच्या आधारकार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. फसवणुकीसाठी आधारकार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने चार विविध बँक खाती उघडल्याचे सिंगने त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला सुमारे सात लाख रुपये हस्तांतरित केले. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा पाठविली जाणार होती.
आणखी वाचा-उत्सवांत लेझर, डीजेला बंदी नाहीच; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका निकाली
पहिल्यांदाच त्यांच्यासोबत मुंबई पोलीस दलासह सायबर पोलीस आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनमधील अधिकारी बोलत होते. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. सात लाख रुपये पाठविल्यानंतर त्यांना आणखी २५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. या अधिकार्यांकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदारांना संशय आला. त्यांनी याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांकडे तक्रार केली, त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बँक खात्याच्या माध्यमातून तपास केला असता सुनील गर्गचे बँक खाते गैरव्यवहारासाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला हरियाणातून अटक केली.
सुनीलचा पूर्वी पैसे हस्तांतरित करण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर तो सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या संपर्कात आला व त्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी मदत करू लागला. त्यासाठी तो काही रक्कम कमिशन म्हणून घेत होता. बँक खाती उघडण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात येत होता, असे तपासात उघड झाले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd