लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिटकार्डवरून सायबर भामट्यांनी पाच लाख रुपयांचे व्यवहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार महिलेच्या पतीवर दीर्घ आजाराने विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलीकडे त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारीनुसार, पती अतिदक्षता विभागात असताना, तक्रारदार महिलेला तिच्या पतीच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्याने बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
आणखी वाचा-कांदिवली ते दहिसर भागात उद्या पाणीपुरवठा कमी दाबाने
पतीकडून त्याच्या क्रेडिट कार्डवर दुसऱ्या दिवसापासून ५० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क माफ करून घेण्यासाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागेल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. पतीच्या तब्येतीची आधीच काळजी असल्याने महिला घाबरली. तिच्या पतीच्या क्रेडिट कार्डवर कोणतेही अतिरिक्त अनुचित शुल्क टाळण्यासाठी तिने भामट्यानी पाठवलेल्या संकेतस्थळावरील अर्जात सर्व माहिती भरली.
काही क्षणांनंतर तिच्या पतीच्या क्रेडिट कार्ड खात्यातून एकूण चार लाख ८८ हजार रुपये हस्तांतरीत झाले. तिला तीन व्यवहार झाल्याचे संदेश प्राप्त झाले. धक्का बसलेल्या महिलेने बँकेच्या मदतवाहिनी दूरध्वनी केला तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले.
आणखी वाचा-खारघर दुर्घटना अहवाल १० महिन्यांनंतरही गुलदस्त्यातच!
मात्र, दोन दिवसांनंतर महिलेने पुन्हा बँकेत फोन करून तपासणी केली असता महिलेला त्यांच्या पतीच्या क्रेडिट कार्डवरून तीन व्यवहार झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून प्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.