मुंबई : बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या चौकशीच्या मागणीसाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणी सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांना आरोपी करण्यात आलेले नाही. परंतु त्यांनीच बेकायदा फोन टॅप केल्याचा आणि राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना पोलिसांच्या बदल्यांमधील कथित भ्रष्टाचाराचा गोपनीय अहवाल उघड केल्याचा आरोप आहे.

सायबर पोलिसांनी मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज करून मलिक यांची फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. फोन टॅपिंगशी संबंधित कागदपत्रांचा एक संच मलिक यांच्याकडे होता. याच कागदपत्रांचा समान संच शुक्ला यांनी कथितरित्या उघड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मलिक यांची चौकशी करायची असून त्यासाठी परवानगी देण्याची मागणी सायबर पोलिसांनी केली आहे.