मुंबई : आर्थिक गुन्ह्यांत अडकल्याचे भासवून दादरमधील महिलेची पावणेसहा कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांना यश आले आहे. तक्रारदार महिला आरोग्य सल्लागार असून आरोपींनी त्यांना विविध खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले होते. त्यातील सव्वाकोटी रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे.

विजय गौतम घोडके असे अटक आरोपीचे नाव असून तो पुण्यातील उंड्री येथील रहिवासी आहे. उपायुक्त (गुन्हे प्रकटीकरण) दत्ता नलावडे व प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण दोर्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंह वचकल व हवालदार विकास तटकरे व पोलीस शिपाई कैलास बाबरे यांच्या पथकाने पुण्यातून आरोपीला अटक केली. सायबर फसवणुकीतील एक कोटी २५ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी भादंवि कलम ४१९, ४२०, ३८४, ४६५, ४६८, ४७१, १७० १७१, १२० ब सह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ क, ६६ ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा…खासगी गृहप्रकल्पांतील ९१३ सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री

तक्रारदार महिला ४७ वर्षांच्या असून दादर पूर्व येथील रहिवासी आहेत. त्यांना ३० मार्च रोजी राहुल देव नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी करून कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने इराणमध्ये एक टपाल पाठविण्यात आले होते. त्यात पाच पारपत्रे, ४५० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ, कपडे, लॅपटॉप सापडले. त्या पार्सलसाठी तुमच्या आधारकार्डचा वापर करण्यात आला असून ते पार्सल कस्टम विभागाने थांबवले आहे. तसेच पोलिसही याप्रकरणी तपास करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना अनमित कोंडल नावाच्या एका तोतया महिला पोलिसाने दूरध्वनी केला. त्यांच्या आधारकार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. फसवणुकीसाठी आधारकार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे सांगितले. यावेळी तोतया उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यानेही त्यांच्याशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने आपले नाव उपायुक्त मिलिंद भारंबे असल्याचे सांगितले. आर्थिक गैरव्यवहा रामुळे त्यांना क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळणार नाही, असे सांगून पुढे त्यांना विविध खात्यात आरोपींनी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार नऊ व्यवहारांद्वारे तक्रारदार महिलेने पाच कोटी ८७ लाख ९९ हजार ७८४ रुपये बँक खात्यामध्ये जमा केले. याप्रकरणी इतर आरोपींचाही सहभाग असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.