मुंबई : म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीमध्ये अडकविण्यात आलेल्या ६० भारतीयांची महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने सुटका केली. या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह पाच दलालांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये वेब सिरीज आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमामधील एका कलाकाराचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सायबर गुलामगिरीसाठी म्यानमारमध्ये माणसे पाठविण्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मनीष ग्रे ऊर्फ मॅडी, तैसन ऊर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, जेन्सी राणी डी आणि चिनी-कझाकस्तानचा नागरिक असलेला तलानिती नुलाक्सी यांचा समावेश आहे. मनीष ग्रे ऊर्फ मॅडी हा वेब सिरिजमध्ये अभिनेता म्हणून काम करीत होता. तर दलाल तलानिती नुलाक्सी याला अटक करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने तीन प्रथम माहिती अहवाल नोंदवले आहेत.

म्यानमारमध्ये कसे नेण्यात आले

विविध समाज माध्यमांद्वारे आरोपींनी भारतातील या ६० पीडित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना थायलंड आणि पूर्व आशियाई देशांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले. नोकरीसाठी तयार झालेल्या नागरिकांना दलालांमार्फत पारपत्र आणि विमानाची तिकीटे देण्यात आली. या सर्व नागरिकांना पर्यटक व्हिसावर थायलंडमध्ये पाठविण्यात आले. तेथून त्यांना म्यानमारच्या सीमेवर पाठवण्यात आले. तेथे एका लहान नदीतून त्यांना एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे या नागरिकांना सशस्त्र बंडखोरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना डिजिटल घोटाळ्यापासून औद्योगिक स्तरावर बनावट गुंतवणूक योजनांमार्फत सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबरमधील अधिकाऱ्यांनी दिली.

भारतातील फसव्या कॉल सेंटरचे नेटवर्क उघडकीस

भारतातील नागरिकांना परदेशातील नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या एजंट आणि फसव्या कॉल सेंटर कंपन्यांचे नेटवर्क उघडकीस आले असून, अनेक कंपन्या रोजगार एजन्सीच्या नावाखाली कार्यरत मानवी तस्करी करीत आहेत. मनीष ग्रे याने पीडित व्यक्तींना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना म्यानमारमध्ये पाठवले होते. तसेच भारतात सायबर गुन्हे करण्यासाठी एक युनिट सुरू करण्याची योजना तलानिती नुलाक्सी याने आखली होती. महाराष्ट्र सायबरने अन्य संस्थाच्या मदतीने कारवाई करून या ६० नागरिकांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याचे महाराष्ट्र सायबरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही कारवाई म्यानमारमध्ये करण्यात आली होती की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.