मुंबई : मुंबईत नागरिकांना निर्धास्तपणे चालण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कमतरता आहे. उपनगरांच्या तुलनेत शहरात चालण्यासाठी मोकळी आणि सुरक्षित जागा असल्यामुळे उपनगरांमधील सुविधांवर भर देण्याची अधिक गरज आहे. सध्या मुंबईत मेट्रो प्रकल्प, सागरी किनारा मार्ग, अटल सेतू, काँक्रीटीकरण तसेच अन्य प्रकल्प उभारले जात आहेत.
नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित, सुसज्ज रस्ते मिळावेत, यासाठीही महापालिकेने नियोजन केले आहे. दरम्यान, सागरी किनारा मार्गावरील भरावभूमीवरील सायकल मार्गिका येत्या मे अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच, कोणतेही काम राजकीय इच्छाशक्तीशिवाय पूर्ण होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईकरांना चालण्यासाठी सुरक्षित, सुटसुटीत आणि अतिक्रमणमुक्त पदपथ मिळावेत, यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी वॉकेबल सिटीज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमला रुईया, मंजू लोढा, रती गोदरेज, मयांक गांधी, रमेश आणि पवन पोद्दार, प्रदीप खेरुका, सुशील जीवराजका, आनंदिनी ठाकूर, अजय अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. या परिषदेदरम्यान गगराणी बोलत होते. ४० टक्के मुंबई भराव भूमीवर वसलेली आहे.
मध्य मुंबईत पूर्णतः भराव टाकून तयार करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दर्जेदार रस्त्यांची बांधणी करताना यंत्रणेला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. कमी कालावधीत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्याचे प्रमाण आदींमुळे रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात अडचणी येत आहेत. तसेच मुंबईतील भरावभूमीमुळे कितीही प्रयत्न केले तरीही त्याला निसर्गाच्या मर्यादा येतात. मुंबईत रस्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे, भेगा या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे नागरिकांची गैरसोय होत असली तरी येत्या काळात मुंबईकरांना दर्जेदार रस्त्यांचा अनुभव मिळेल. नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित, आरामदायक रस्ते मिळावेत यासाठी अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करण्यात आली आहे. नाल्यांच्या आसपास वृक्षलागवड करण्यासाठी शहरात शक्य असेल तिथे झाडांची लागवड केली जात आहे.
दरम्यान, रस्ते आणि पदपथांवरून चालण्यासाठी फेरीवाले मोठ्या अडथळा ठरत आहेत. पालिकेमार्फत शेकडो मनुष्यबळाच्या साहाय्याने दररोज अवैध फेरीवाल्यांना हटविले जाते. मात्र, ही समस्या जैसे थे आहे. नागरिकांनी एकत्र येऊन फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करणे बंद केल्यास ही समस्या मार्गी लागेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला व्यायाम करणे शक्य नाही. किमान त्यांना चालण्यासाठी सुरक्षित पदपथ मिळणे गरजेचे आहे. नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक पदपथ मिळावेत, यासाठी वॉकिंग प्रोजेक्ट ही संस्था २०१२ पासून कार्यरत आहे. सुरक्षित पदपथांबाबत व्यापक स्तरावर चर्चा करण्यासाठी वॉकेबल सिटीज परिषद आयोजित करण्यात आली होती.
मुंबईत दररोज ४७ टक्के नागरिक पायी किंवा सायकल चालवण्याला प्राधान्य देतात. २२ टक्के नागरिक लोकल, तर ११.५ टक्के नागरिक मोटारीने प्रवास करतात. तसेच, ७० टक्के विद्यार्थी पायी शाळेत जातात. पायी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची आवश्यकता आहे.
मात्र, तुटलेले – उखडलेले पदपथ, पदपथांची असमान उंची, रस्ते, पदपथांवर अवैधरित्या उभी केलेली वाहने, बस स्थानकांची अयोग्य उभारणी, अस्वच्छ आणि अरुंद पदपथ, अस्पष्ट झालेले झेब्रा क्रॉसिंग आदी विविध कारणांमुळे मुंबईकरांना चालण्यासाठी सुरक्षित रस्ते उरलेले नाहीत. मुंबईत विविध प्रकारच्या रस्त्यांवर पदपथांची किती रुंदी असावी, याबाबत नियम असतानाही बहुतांश ठिकाणी त्यांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्याचा प्रकार – पदपथांची आवश्यक रुंदी
निवासी परिसरातील रस्ता – ३ मीटर
बहुउद्देशीय रस्ता – ४ मीटर
वर्दळ आणि गर्दीच्या ठिकाणचे रस्ता – ५ मीटर
दुकाने आणि व्यावसायिक क्षेत्रातील रस्ते – ६ मीटर