मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो, मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान, शनिवारी जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात धूळ आणि वाळूचे लोट उसळले होते. तसेच समुद्रही खवळला होता.
बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर आहे. आगामी २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
वाऱ्याच्या तडाख्याने..
बिपरजॉय चक्रीवादळाची चाहूल देणारे जोरदार वारे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी वाहत होते. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उसळले. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात १६ वृक्ष उन्मळून पडले.
इशारा काय?
येत्या दोन दिवसांत बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात जाणवण्याची आहे. वाऱ्यांचा ताशी वेळ ४० ते ५० किलोमीटर असेल. तो ताशी ६५ किलोमीटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मोसमी पाऊस ४८ तासांत महाराष्ट्रात
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकची किनारपट्टी गाठली. सोमवापर्यंत गोवा आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते. मात्र त्याचा मुंबईला धोका नाही. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दोन दिवस जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो. – सुषमा नायर, हवामान विभाग