तीन दिवसांत अंदमानात

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘महासेन’ चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) भारताकडील प्रवासाला गती मिळाली असून, येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून अंदमान बेटांजवळच्या समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्य स्थितीपेक्षा मान्सून तीन दिवस आधी अंदमानात पोहोचणार असल्याने त्याचे केरळ व पर्यायाने देशभरातील आगमनही लवकर होण्याची सुचिन्हे आहेत, मात्र याबाबत आताच कोणताही अंदाज करण्यास हवामान खात्याने नकार दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तीन दिवसांपूर्वी ‘महासेन’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे मान्सूनच्या भारताकडील प्रवासाला चालना मिळाली आहे. भारतीय उपखंडातील पहिला मुक्काम असलेल्या अंदमान समुद्रात तो गुरुवार-शुक्रवापर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेतील अधिकारी एस. बी. गावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राला अद्याप प्रतीक्षा

अंदमान बेटांवर २० मेला दाखल झाल्यानंतर पुढे १ जूनच्या सुमारास केरळ किनारपट्टीवर पोहोचतो. मान्सूनचे अंदमानात लवकर आगमन होत असल्याने पुढेही त्याची प्रगती चांगली असेल, असे गृहीत धरले जात आहे. मात्र अंदमानात लवकर आल्यामुळे तो केरळातही वेळेआधी दाखल होणार का हे आताच सांगता येणार नाही. त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागेल, असेही गावकर यांनी सांगितले. सामान्यत: तो ५ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होतो.

Story img Loader