‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष आणि उद्यम जगतातील उमदे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल  हे गंभीर जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र या अपघाताच्या प्राथमिक चौकशीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Cyrus Mistry Death: सायर मिस्त्रींच्या निधनावर ‘टाटा सन्स’कडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढ्या कमी वयात त्यांचं निधन…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मरण पावलेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठड्याला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आलं आहे. मागील सीटवर बसल्यानंतर सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबतच्या प्रवाशाच्या जीवावर बेतली. पुढच्या आसनावरील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वापीला हलवण्यात आले.

हा अपघात कसा झाला यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून या अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अपघात झाला तेव्हा गाडी फार वेगात होती असं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. तसेच गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याचंही पोलिसांनी म्हटल्याचं पीटीआयने ट्वीट केलं आहे.

चालकाला चकवा…
तिसरी महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे अपघात झालेलं ठिकाण. मुंबई-अहमदाबाद या सहापदरी महामार्गाचा अजूनही काही भाग चौपदरीच आहे. अपघाताच्या ठिकाणी तीनपदरी रस्ता निमुळता होत पुलावर दुपदरी होतो. परंतु याबाबतचा सूचना फलक लावला नसल्याने चालकाला चकवा देणाऱ्या या रस्त्याचा अंदाज येत नाही. मिस्त्री यांच्या चालकालाही या चकव्याचा अंदाज न आल्याने मोटार पुलाच्या कठड्यावर आदळली, असे सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyrus mistry and co passenger killed in car crash were not wearing seat belts says police scsg