उपनगरी रेल्वेमधील गर्दी चुकविण्यासाठी अपंग, कर्करुग्ण व गरोदर स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून आरामशीर प्रवास करणाऱ्या पोलिसांनी या डब्यातील अपंगांवरच दादागिरी सुरू केली आहे. गर्दीच्या वेळी पोलिसच विकलांगांच्या जागा अडवून बसतात आणि विरोध करणाऱ्या अपंग प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारतात, अशा तक्रारी आहेत. हाताने व पायाने अधू असलेल्या एका प्रवाशावर तर चक्क साखळी खेचल्याचा गुन्हा दाखल करून त्याच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे अपंग प्रवाशांमध्ये पोलिसांचीच दहशत पसरली आहे.
लोकल रेल्वेच्या आरक्षित डब्यांमधून पोलिसांना आणि सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासास मनाई आहे. परंतु नियम धाब्यावर बसवून पोलीसच बिनधास्तपणे अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना दिसतात.
 २० जुलै रोजी एका आयटी कंपनीत नोकरी करणारे रवींद्र फेगडे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावर कसारा लोकलमध्ये चढले. गाडीला इतकी गर्दी होती की पोलिसही आत घुसले. त्यावेळी रवींद्र व इतर काही प्रवाशांनी हा अपंगांचा डबा आहे आपण बाहेर जावे, अशी विनंती केली. परंतु त्याचा त्यांना राग आला. ठाणे रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर डब्यातील पोलिसांनी रेल्वे सुरक्षा जवानांना बोलावून घेतले आणि उजवा हात व पाय अधू असलेल्या त्या अपंग प्रवाशावर चक्क साखळी खेचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला चार तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले व दोन हजार रुपये दंड भरल्यानंतर सोडून देण्यात आले. अशाच प्रकारे अपंग डब्यात प्रवेश करण्यास विरोध केला म्हणून एका पोलिसाने नितीन गायकवाड या प्रवाशाला मारहाण केली. त्या पोलिसाविरुद्ध दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
८० टक्के डब्यांमध्ये अद्याप सुरक्षारक्षक नाही
..तर कारवाई -पोलीस आयुक्त
आरक्षित डब्यांतून इतरांनी प्रवास करणे गुन्हा असून अशा डब्यांतून प्रवास करू नये, अशा सूचना पोलिसांनाही देण्यात आल्या असून या डब्यांमधून पोलीस बेकायदा प्रवास करीत असतील तर कारवाई करावी, अशा सूचना रेल्वे सुरक्षा दलास दिल्या आहेत, असे रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार म्हणाले.