समुद्रावरून परतलेल्या मच्छीमारांनी किनाऱ्यावर लावलेल्या होडय़ा आणि त्यांना अडकवलेली मासेमारीची जाळी ही दृश्ये आपल्याला पाहायला छान वाटतात. मात्र, सलमान खानला आपल्या राहत्या बंगल्यातून निळ्याशार अथांग समुद्राचे दर्शन घेताना मध्येच नेमक्या त्या जाळ्या आणि होडय़ा खटकत होत्या. सलमानचे समुद्रदर्शन सुखकर व्हावे म्हणून त्याच्या अंगरक्षकांनी ‘दबंग’गिरी करत आपला छळ केल्याचा आरोप वांद्रे येथील मच्छीमार कुटुंबाने केला आहे. सलमानविरोधात पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सलमानने वांद्रे येथील चिम्बई परिसरात ‘बेले व्ह्यू’ आणि ‘बेनार’ असे दोन बंगले २०११ मध्ये विकत घेतले होते. त्यानंतर या बंगल्याभोवती कुंपणही घालण्यात आले. सलमानने बंगल्याचा ताबा घेतल्यानंतर लगेचच तिथे होडय़ा आणि मासेमारीची जाळी लटकवून ठेवणाऱ्या मच्छीमारांना त्याच्या अंगरक्षकांनी त्रास द्यायला सुरुवात केली, अशी माहिती लॉरेन्स फाल्कन या मच्छीमाराने दिली. आम्ही तिथे आमच्या चार होडय़ा आणि जाळ्या ठेवत होतो. तुम्ही होडय़ा तिथे ठेवत जाऊ नका, सलमानला समुद्र दिसत नाही, अशी तंबी अंगरक्षकांनी दिल्याचे फाल्कननी सांगितले. या प्रक रणी वांद्रे पोलीस ठाण्यात तीनदा तक्रार नोंदविण्यात आली, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही, असे फाल्कन यांचे म्हणणे आहे. आज फाल्कन आणि त्यांना या प्रकरणी मदत करणारे पेरी रोड रहिवासी संघाचे अध्यक्ष अनिल जोसेफ यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली आहे. आपल्याला सातत्याने त्रास दिल्याप्रकरणी सलमान खान, वडील सलीम खान आणि अंगरक्षक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत केली असून विश्वास नांगरे पाटील यांनी मंगळवारी आपल्याला भेटण्यास सांगितले असल्याची माहितीही फाल्कन यांनी दिली.
सलमानच्या ‘समुद्र’दर्शनासाठी अंगरक्षकांची ‘दबंगगिरी’!
समुद्रावरून परतलेल्या मच्छीमारांनी किनाऱ्यावर लावलेल्या होडय़ा आणि त्यांना अडकवलेली मासेमारीची जाळी ही दृश्ये आपल्याला पाहायला छान वाटतात. मात्र, सलमान खानला आपल्या राहत्या बंगल्यातून निळ्याशार अथांग समुद्राचे दर्शन घेताना मध्येच नेमक्या त्या जाळ्या आणि होडय़ा खटकत होत्या.
First published on: 04-03-2013 at 03:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabanggiri of bodyguard of salman khan