दाभोळच्या ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि.’ वीजप्रकल्पासाठी काही दिवसांपुरता वाढवण्यात आलेला गॅसचा पुरवठा पुन्हा कमी झाल्याने या प्रकल्पातील वीजनिर्मिती १२०० मेगावॉटवरून २५० ते ३०० मेगावॉटपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार वीजनिर्मिती वाढवून विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करून भारनियमन नियंत्रणात ठेवण्यात येत आहे.
दाभोळच्या वीजप्रकल्पातील वीजनिर्मिती महिनाभरापूर्वी जवळपास बंद पडली होती. त्यातूनच प्रकल्पच बंद करण्याची वेळ येईल याबाबतचा इशारा कंपनीने केंद्र सरकारला दिला. त्यामुळे लागलीच १५-२० दिवसांसाठी वायूचा पुरवठा वाढवण्यात आला. परिणामी या प्रकल्पातून सुमारे पंधरवडाभर १२०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू राहिली. त्यानुसार कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती कमी करण्यात आली. आता पुन्हा दाभोळ प्रकल्पाचा गॅस पुरवठा कमी झाला असून वीजनिर्मिती सरासरी २५० ते ३०० मेगावॉटपर्यंत खाली आली आहे.
राज्याला उपलब्ध होत असलेली एक हजार मेगावॉट वीज मिळणे बंद झाल्याने भारनियमन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना वीजप्रकल्पातून गरजेनुसार एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात ठिकठिकाणी अधूनमधून पाऊस पडत असल्याने विजेची मागणीही सुमारे ६०० मेगावॉटने कमी झाली आहे. त्याचाही लाभ भारनियमन नियंत्रणासाठी होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा