प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याकरिता २.९ एमएमसी गॅसची आवश्यकता
पूर्वश्रमीचा एन्रॅन हा बंद पडलेला वीज प्रकल्प सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकारने सुरू केला असला तरी पुरेसा गॅस मिळत नसल्याने हा प्रकल्प आजपासून बेमुदत काळासाठी बंद पडला.
दाभोळचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याकरिता २.९ एमएमसी गॅसची आवश्यकता असताना सध्या १.१ एवढाच गॅस मिळत होता. गेले काही दिवस गँस कमी होत गेला. आजपासून नैसर्गिक वायुचा पुरवठा बंद झाल्याने दाभोळ प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती बंद करावी लागली. राज्याला या प्रकल्पातून सध्या २०० ते २५० मेगावॉट वीज मिळत होती. दाभोळ प्रकल्प बंद पडल्याने राज्याच्या वीजनिर्मितीएवढा फरक पडणार नाही, असे महाराष्ट्र वितरण कंपनीचे व्यवस्थापक अजय मेहता यांनी सांगितले.
रियालन्स कंपनीच्या आंध्रमधील कृष्णा खोऱ्यातून गॅसचा अपुरा पुरवठा होत असल्याने दाभोळ प्रकल्पावर परिणाम झाला. केंद्र सरकारने सुमारे १० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजेच १९६७ मेगावॉट वीजनिर्मिती करू शकेल अशा पद्धतीने ठिकठाक केला होता.
पण गॅसच्या दरावरून रियालन्स आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादामुळे दाभोळ प्रकल्प बंद पडल्याचे सांगण्यात आले. हा प्रकल्प किती काळ बंद राहिल याबाबत काहीच सांगणे शक्य नाही, असे वितरण राज्य शासनातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा