मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल झाले असून खटलाही निकालाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासावर आणि सध्या सुरू असलेल्या खटल्यावर न्यायालयीन देखरेखीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. तसेच तपासावर न्यायालयीन देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले की न्यायालयीन देखरेखीची प्रक्रिया संपुष्टात येते. त्यानंतर खटला चालवणाऱ्या न्यायालयाने या सगळय़ा बाबींची काळजी घेणे अपेक्षित आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दाभोलकर कुटुंबीयांची याचिका निकाली काढताना दाखला दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा विचार करता दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसा अहवाल सीबीआयने दिल्ली येथील मुख्यालयाकडे पाठवला आहे. शिवाय खटल्यातील ३३ पैकी १८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून काहीच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे शिल्लक आहे. आणखी साक्षीदारांना पाचारण करणार नसल्याचे सीबीआयनेही आधीच स्पष्ट केले आहे. या सगळय़ा स्थितीचा विचार करता या प्रकरणावर उच्च न्यायालायने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने आपल्या आठ पानी आदेशात नमूद केले आहे.

तपासाबाबत असमाधानी असलेल्या दाभोलकर कुटुंबीयांनी प्रकरणाचा तपास आणि खटल्यावर न्यायालयीन देखरेख कायम ठेवण्याची मागणी केली होती. तर विक्रम भावे आणि वीरेंद्र तावडे या आरोपींनी हस्तक्षेप याचिका करून प्रकरणावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणी मंगळवारी निर्णय देताना दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य करून त्यांनी केलेली याचिकाही निकाली काढली. दरम्यान, तपासवरील देखरेख कायम ठेवायची की नाही याचा निर्णय घ्यावाच लागेल. अन्यथा हे कधीच संपणार नाही, असे न्यायालयाने या मुद्दय़ावरील निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabholkar murder case high court refusal to maintain judicial supervision over investigation ysh