डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी सनातन संस्थेसह इतर हिंदूत्ववादी संघटनांना आरोपीच्या पिंजऱयात उभा करण्याचा प्रकार चुकीचा असून, आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे आम्ही स्पष्टपणे खंडन करतो, असा खुलासा बुधवारी सनातन संस्थेच्या पदाधिकाऱयांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. सनातन संस्थेचे सुनील घनवट, अभय वर्तक आणि संजीव पुनाळेकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सनातन संस्थेवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयाची सुई सनातन संस्थेकडे असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला.
सुनील घनवट म्हणाले, दाभोलकरांबरोबरचा आमचा लढा वैचारिक होता. त्यांचे आणि आमचे वैयक्तिक वैमनस्य नव्हते. आम्ही सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडत होतो. वैचारिक मुद्द्यांचा हिंसक पद्धतीने लढा देण्याचे आम्ही कधीही समर्थन करीत नाही. मात्र, हिंदूत्त्ववादी संघटनांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचे आम्ही खंडन करतो. पोलिस या हत्येचा तपास करीत आहेत. त्यांचा तपास पूर्ण होण्याआधीच कोणताही तर्कवितर्क लढविण्यात येऊ नये.
जादूटोणाविरोधी विधेयकाला हिंदू जनजागृती समितीचा विरोध आहे. त्यातील काही कलमे ही धर्मविरोधी असल्यामुळेच त्याला विरोध आहे. मात्र, त्याचा आणि दाभोलकर यांच्या हत्येचा काहीही संबंध नाही, असेही घनवट यांनी सांगितले.
दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातन संस्थेची वाटेल तशी बदनामी सुरू आहे, आम्हाला नाहक बदनाम केले जात आहे, असा आरोप अभय वर्तक यांनी केला.

Story img Loader