दादर परिसरात भरदिवसा एका तरुणीवर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मात्र, पत्नी समजून दुसऱ्याच तरुणीवर हल्ला केल्याचे आरोपी विजय सांगलेकर याने मान्य केल्याने हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला असावा, असा अंदाज आहे.
विजयचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद होते. त्या वादाला कंटाळून त्याने पत्नी वैशालीची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने तिला दादरला भेटण्यासाठी बोलावले होते. तो तिची वाट पाहत थांबला होता. त्याच वेळेस सोनल तेथून जात होती. तिच्या तोंडावर असलेला स्कार्फ आणि चालण्याची लकब पाहून सोनल ही आपलीच पत्नी आहे, असे समजून विजयने तिच्यावर वार केल्याची माहिती मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण साळुंखे यांनी दिली.  या हल्ल्यात सोनलच्या हनवटीवर, मानेवर एकूण पाच ते सहा वार झाले. सुरुवातीला सोनलला सायन रुग्णालयात आणि नंतर बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे. विजय सांगेलकर हा बेरोजगार इसम सिंधुदुर्ग जिल्ह्णाातील सांवतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील जायपीवाडी येथे राहतो. २००७ मध्ये त्याचे पांरपारिक पद्धतीने वैशालीसोबत लग्न झाले.पंरतु लग्नाच्या काही महिन्यातंच त्याचे पत्नीशी खटके उडू लागले होते. त्यांना चार वर्षे वयाचा मुलगा आहे. विजय आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिने तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर विजयसह भाऊ आणि त्याच्या आईला अटक झाली होती. विजयला तिच्यापासून घटस्फोट हवा होता. पण त्याची पत्नी घटस्फोट देत नसल्याने तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्यामुळेच त्याने पत्नीला संपविण्याचा निर्णय घेतल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त खंडागळे यांनी सांगितले.    

Story img Loader