लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर – धुळे आणि दादर – मनमाड एक्स्प्रेसला २१ जुलैपासून इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फमन बुश (एलएचबी) प्रकारचे १५ डबे जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गाडी क्रमांक ०१०६५/६६ दादर- धुळे एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ०२१०१/०२ दादर – मनमाड एक्स्प्रेसची रंगसंगतीही बदलण्यात येणार असून या एक्स्प्रेस गाड्या भविष्यात निळ्याऐवजी लाल – करडा संगसंगतीत दिसणार आहेत.
चेन्नई येथे बनविण्यात आलेले इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डबे मध्य रेल्वेवरील दादर – मनमाड एक्स्प्रेस आणि दादर – धुळे एक्स्प्रेसला जोडण्यात आले आहेत. मात्र पंजाब येथील कपुरथळातील रेल कोच फॅक्टरीत तयार केलेले आधुनिक प्रकारातील लिके होल्फमन बुश (एलएचबी) डबे २१ जुलैपासून या एक्स्प्रेसना जोडण्यात येणार आहेत. या डब्यांची लांबी – रुंदी तुलनेत अधिक आहे. त्याचबरोबर दरवाजातील जागाही अधिक आहे. त्यामुळे एक्स्प्रेसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांना धक्काबुक्की होणार नाही. सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपात दादर – मनमाड एक्स्प्रेस आणि दादर – धुळे एक्स्प्रेस दिसणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
आणखी वचा-मुंबई: अखेर कोनमधील २,४१७ घरांच्या दुरुस्तीला सुरुवात
एलएचबी डब्यांची स्टीलने बांधणी करण्यात आली आहे. तर आतील भागात अॅल्युमिनिअम धातूचा वापर करण्यात आला आहे. गाडीचे वजन कमी झाल्याने एक्स्प्रेसचा वेग वाढणार असून प्रवाशांचा प्रवास आणखी वेगात आणि अधिक आरामदायी होणार आहे. एलएचबी डबे अॅण्टी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून त्यांचे वजन साधारण ३९.५ टन आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी असते. तसेच अपघात झाल्यास प्रवाशांना कमी इजा होण्याची शक्यता असते.