कोणत्याही बाजाराची ओळख तेथे प्रवेश करताच येणारा गंध करून देतो. कपडय़ांच्या बाजारातील नवीन कापडाचा कोरा करकरीत सुवास, दवाबाजारातील नाकपुडय़ांना तीव्रपणे जाणवणारा औषधांचा गंध, फर्निचरच्या बाजारातील ‘पॉलिश’चा नि लाकडाचा गंध अशा गंधांतूनच त्या बाजाराची विशिष्ट ओळख तयार होत असते. पण दादर पश्चिमेकडील फूलबाजारात शिरल्यावर कोणता गंध घ्यावा नि कोणता नको, अशा पेचात आपण पडतो.
१९५० सालापासून दादर स्थानकाजवळच शेकडो फूलविक्रेते फुलांची विक्री करीत आहेत. दादर हे स्थानक मध्यवर्ती असल्यामुळे स्थानकाजवळच हा बाजार सुरू झाला. मात्र पालिकेने १९८५ मध्ये येथील ६३४ विक्रेत्यांना दादर स्थानकापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जागेवर स्थलांतरित केले. आणि याला मीनाताई ठाकरे फूलबाजार असे नाव देण्यात आले. या बाजारासाठी मोठे बांधकाम करण्यात आले. आणि तेव्हापासून आजतागायत हा बाजार येथे बहरत आहे. दादर स्थानकाबाहेर विक्री करणाऱ्या या दुकानदारांना १९९८ मध्ये पालिकेने या भागातच कायमचे वास्तव्य करण्याचे जाहीर केले. मात्र या काळात दादर स्थानकाजवळ नवे फूलविक्रेते येऊन व्यवसाय करू लागले. त्याला विजयनगरचा फूलबाजार या नावाने ओळखले जाते. मात्र यामुळे पूर्वीच्या विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मीनाताई ठाकरे फूलबाजार हा दादर स्थानकापासून लांब असल्याने अधिकतर ग्राहक स्थानकाजवळील विजयनगरच्या बाजारात खरेदी करतो. मात्र मोठय़ा प्रमाणात फुलांची खरेदी करावयाचे असल्यास मीनाताई ठाकरे फूलबाजाराला पर्याय नाही.
सकाळी साधारण चारच्या सुमारास दादर स्थानकाबाहेर लगबग सुरू होते. फुलांनी गच्च भरलेले मोठमोठे ट्रक-टेम्पो पहाटे दादरच्या बाजारात जमा होतात. या वेळेस मुंबई आणि उपनगरातीलही अनेक छोटे व्यापारीही पहाटे येऊन फुलांची खरेदी करतात. येथे अगदीच स्वस्त भावात फुले मिळत असल्याने छोटे विक्रेते येथेच येऊन खरेदी करणे पसंत करतात. सकाळी साधारण ६ वाजेपर्यंत मोठमोठय़ा परडय़ांमध्ये फुले सजलेली असतात. या बाजारात झेंडूला अधिक मागणी असते. आणि इतर बाजाराच्या तुलनेत येथे झेंडू स्वस्त म्हणजे ३० ते ३५ रुपये किलोला मिळतो. त्याशिवाय गुलछडी २० रुपये किलो आणि गोंडा ३० रुपये किलोपर्यंत विकला जातो. त्याशिवाय सहा लाल गुलाबाच्या फुलांचा गुच्छ हा अवघ्या ५ रुपयांना विकला जातो. फुलांबरोबरच तुळस, बेलपत्र, दुर्वा, आंब्यांची पाने, कडुलिंबाच्या पानांचीही येथे विक्री केली जाते. शेवंती, कमळ, जास्वंद, अष्टर, ऑर्किड, जरबेरा यांसारख्या अनेक फुलांचे प्रकार येथे पाहावयास मिळतात. फुलांच्या विक्रीबरोबर लग्नसमारंभासाठी आवश्यक हार, तुरे आणि गाडय़ाही येथे सजावट करण्यासाठी आणल्या जातात. दादर स्थानकाजवळील विजयनगरच्या फूलबाजारातही अशा प्रकारे अनेक विविध प्रकारची फुले पाहावयास मिळतात. अनेकदा या बाजारात माल कमी पडला तर मीनाताई ठाकरे फूलबाजारातून फुले आणली जातात. विजयनगर बाजारात कट फ्लॉवर्स म्हणजे दांडी असलेल्या फुलांची संख्या अधिक असते.
एरवी किरकोळ दुकानात १० रुपयांना मिळणारे गुलाब या बाजारात अगदी स्वस्त म्हणजे २० गुलाबाची फुले केवळ ३० रुपयांत विकली जातात. मीनाताई ठाकरे आणि विजयनगर हे दोन्ही बाजार घाऊक बाजार असले तरी येथे किरकोळ खरेदीही केली जाते. सण-उत्सवाच्या काळात तर या बाजाराला जत्रेचे स्वरूप येते. आणि किमतीही वधारतात. उत्पादक किमती वाढवीत असल्यामुळे विक्रेत्यांनाही किमती वाढवाव्या लागतात असे त्यांचे म्हणणे असते. फुले ही फार काळ टिकत नसल्याने आलेला माल लवकरात लवकर खपविण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न असतो. मात्र त्यातही न खपलेल्या फुलांच्या पाकळ्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. किंवा काही छोटे विक्रेते ही फुले अगदी कमी किमतीत विकत घेतात. आधीच ही फुले रात्रभराचा प्रवास करून आलेली असल्यामुळे पहाटे बाजारात आल्यानंतर फुलांची विक्री जोरात सुरू होते. मुंबईतील या बाजारांमध्ये येणारा अधिकतर माल हा पुणे, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, वसई, विरार तर कधी बंगलोर आणि परदेशातूनही मागविला जातो. वसई येथून सोनचाफा मागविला जातो तर सातारा, सांगली येथून झेंडू आणला जातो. मुंबई व अनेकदा उपनगरातील विक्रेते येथून फुलांची खरेदी करतात. खरेदी-विक्री जोरात सुरू असते ती दुपारी १ वाजेपर्यंत. त्यानंतर मात्र बाजार थंडावतो. पहाटेपासून कामाला जुंपलेले विक्रेते आपआपल्या दुकानात विसावतात. सध्या या बाजारात मूळ मालक हे दुकानावर बसून खरेदी-विक्री करीत नाहीत. तर मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या परराज्यातील लोक या दुकानात दिसतात. त्यामुळे दुकानांवर नावे जरी मराठी दिसत असली तरी येथील अधिकतर विक्रेते हा उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा या भागातील आहेत.
सुरुवातीला केवळ फुलांसाठी सुरू झालेल्या हे दोन्ही बाजारांत दिवसागणिक अनेक बदल झाले आहे. आता फक्त झेंडू व मोगऱ्यापुरते सीमित न राहता विविध सजावटीची फुले, साहित्यही बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे हार, गुच्छ बनविताना सजावटीची वेगळी दुकाने ही या बाजारात थाटू लागली आहे. मीनाताई ठाकरे बाजारात दिवसाला ४ टन झेंडूंचा खप होतो. इतकाच खप विजयनगर बाजारातही होतो. याशिवाय इतरही महागडी फुले या बाजारात येत असतात. त्यामुळे दरदिवसाला साधारण लाखोंची उलाढाल या बाजारात होत असते. नोटाबंदीनंतर झालेल्या चलनकल्लोळामुळे काही दिवस बाजार अगदी शांत झाला होता. मात्र हळूहळू येथील परिस्थिती स्थिरस्थावर होत आहे.
मीनल गांगुर्डे
@MeenalGangurde