इमारतींच्या जंगलांनी वेढलेल्या मुंबई नगरीत काही ‘हिरवी’ स्थाने अजूनही टिकून आहेत. माटुंगा आणि दादर यांच्या सीमेवर असलेले ‘फाइव्ह गार्डन’ हे त्यापैकीच एक. अतिशय आकर्षक, चकचकीत आणि नियोजनबद्ध रस्ते आणि त्यांच्या बाजूला पाच उद्यानांची ही ‘पंचरंगी’ दुनिया.. सारेच आकर्षक, हिरवाईने नटलेले आणि टवटवीत. हा उद्यानसमूह म्हणजे मुंबईची आणि त्यातही प्रेमीयुगुलांची ‘जान’च!
या पाच उद्यानांच्या समूहाचे खरे नाव ‘मंचेरजी जोशी पाच उद्यान’ असे आहे. मात्र माटुंगा, दादर वा वडाळा स्थानकावरील कोणत्याही टॅक्सीचालकाला जर या नावाने पत्ता विचारला तर तो माहीत नाही, असेच सांगेल. पण ‘फाइव्ह गार्डन’ असे विचारल्यास तो या उद्यानांच्या दारातच तुम्हाला आणून सोडेल. कारण फाइव्ह गार्डन हे आता या बगिच्याचे सर्वमान्य नाव झालेले आहे.
मध्ये हिरवाईने नटलेले एक मोठे वर्तुळ..त्या मधोमध लहान वर्तुळ आणि चार सरळ रस्ते या वर्तुळांमध्ये येतात आणि या मोठय़ा वर्तुळाची पाच भागांत विभागणी करतात.. अशा प्रकारे हे उद्यान तयार झाले आहे. एखाद्या पिझ्झाचे चार समान तुकडे करावे त्याप्रमाणे हे उद्यान भासते. उद्यानाच्या एका बाजूला पारशी कॉलनी आहे. पारशी माणूस हा एकदम शांत प्रवृत्तीचा. त्याप्रमाणचे हे उद्यान भासते.. एकदम शांत आणि निवांत! उद्यानाच्या मधोमध लेडी जहाँगीर रोड जातो, तर पाच विविध रस्ते या उद्यानापासून फुटतात आणि माटुंगा, वडाळा, दादर, किंग्ज सर्कल भागात जातात.
दादर वा माटुंगा स्थानक परिसरात नेहमीच गजबजाट असतो, पण या स्थानकापासून पाच ते दहा मिनिटांवर असलेला हा परिसर नेहमीच शांत असतो. सकाळ असो वा संध्याकाळ या परिसरात नेहमीच शुकशुकाट असतो. त्यामुळेच प्रेमीयुगुलांचा हे आवडते स्थळ झालेले आहे. अगदी सकाळी सकाळी येथील बाकांवर वा उद्यानांच्या कठडय़ावर प्रेमीयुगुल दिसतात. या परिसरातच रुईया, पोद्दार, वेलिंगकर, खालसा आदी महाविद्यालये असल्याने या महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि त्यातीत प्रेमीयुगुल यांच्यासाठी ही मोक्याची जागा. उद्यानांतील बाकावर, लोखंडी रोलिंगवर वा हिरवळीवर नेहमीच प्रेमीयुगुल आढळणार.
पण केवळ प्रेमीयुगुलांसाठीच हे उद्यान तयार झाले नाही. अगदी चाळिशी पार केलेले गृहस्थ वा साठी ओलांडलेले आजी-आजोबाही निवांतपणा मिळविण्यासाठी फाइव्ह गार्डनमध्ये येतात. सकाळ-संध्याकाळ फिरणाऱ्यांची संख्याही येथे वाढलेली आहे. बाजूला पारशी कॉलनीतील रस्त्यांवरून फिरतानाही एक आनंद वाटतो.. सारा परिसर कसा शांत आणि आल्हाददायक.
एखाद्या उद्यानात केवळ सर्वत्र पसरलेली हिरवळ आढळेल तर काही उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळण्याची सोय करण्यात आलेली आहे. विविध क्रीडा साधने येथे आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला येथे चिमुरडय़ांचाही किलबिलाट असतो. अगदी दुपारच्या पारी येथील हिरवळीच्या गार्डनवर मुले क्रिकेट खेळतानाही आढळतील.
संध्याकाळच्या वेळेला बहुधा येथे खाऊच्या गाडय़ांची रेलचेल असते. वडापाव, पाणीपुरीपासून अगदी सँडविच, चायनीज पदार्थापर्यंतच्या गाडय़ा येथे लागलेल्या असतात. संध्याकाळच्या वेळेस फेरफटका मारायला आणि येथील खाऊगाडय़ांवरील रुचकर पदार्थाचा आस्वाद घ्यायलाही बरेच जण फाइव्ह गार्डनला येतात.
कसे जाल?
* ‘मंचेरजी जोशी पाच उद्यान’ (फाइव्ह गार्डन), माटुंगा
* माटुंगा, दादर, वडाळा वा किंग्ज सर्कल या स्थानकांतून फाइव्ह गार्डनला जाण्यासाठी टॅक्सी मिळू शकते.
* मांटुंगा वा दादर स्थानकापासून जवळच असल्याने चालतही जाता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

– संदीप नलावडे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadar five gardens