बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने याकडे अर्थकारणाच्या दृष्टीने विचार केला जातो. या बाजारातून केली जाणारी निर्यात-आयात, विक्री, उत्पादन, उत्पन्न, तोटा या सर्व बाजूंनी बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मात्र या बाजारांमध्ये एक भावनिक गुंतवणूकही असते. इथे येणाऱ्या ग्राहकांनी केलेली गुंतवणूक. ज्यातून हा बाजार अर्थकारणाच्या अनेक पातळ्या ओलांडतो. बाजारगप्पा या सदरात आतापर्यंत आपण मुंबईतील अनेक बाजारांची सफर केली. त्याचे अर्थकारण जाणून घेतले. शहरांचे प्रतिबिंब हे तेथील बाजारांवर पडत असते. बाजारातील जिवंतपणा त्या शहराची वेगळी ओळख करून देतो. मुंबईत आल्यानंतर मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली प्रत्येक वस्तू ज्या बाजारात मिळते, ज्या बाजारात खरेदी करताना ग्राहकाच्या पैशांबरोबरच भावनिक गुंतवणूक झालेली असते, असा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा बाजारा म्हणजे दादर पश्चिमेकडील बाजार.
साधारण १९६८ साली दादर येथून रेल्वे सेवा सुरू झाली. त्या काळात स्थानकाच्या ठिकाणानुसार त्याच्या आसपास बाजार भरू लागला. हा बाजार स्थानकाजवळ असल्याने प्रवाशांना खरेदी करणे सोपे जात होते. हळूहळू स्थानकाजवळील ही बाजारपेठ विस्तारत गेली. सध्या दादरच्या पूर्व व पश्चिमेला मोठी बाजारपेठ आहे. त्यातही पश्चिमेकडील बाजारात कनिष्ठ मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीय खरेदी करू शकतील अशा प्रकारे बाजाराचा विस्तार झाला आहे. फुले, भाज्या, साडय़ा यांच्यासाठी दादरमध्ये स्वतंत्र बाजार आहेत. दादर पूर्वेकडील स्थानकापासून नक्षत्र मॉल, रानडे रोड आणि वीर कोतवाल उद्यानाच्या जवळचा बाजार हा मुंबईकरांच्या जवळचा. बोरिवली, ठाणे अगदी नवी मुंबईत राहणाऱ्यांची पहिली पसंती क्रॉफर्ड मार्केटपूर्वी त्या तुलनेत जवळ असलेल्या दादरच्या बाजाराला जाते. सणांच्या मोसमात तर या बाजारात तुफान गर्दी असते. गेल्या आठवडय़ापासून दिवाळीची खरेदी करण्यासाठी दादरला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी-रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस असतानाही दादरच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. शनिवारपासून दरदिवशी नवा माल आणावा लागत असल्याचे येथील दुकानदार सांगतात.
दिवाळीसाठीचे कपडे, साडय़ा, पणत्या, कंदील, रांगोळी, सजावटीचे सामान या सर्व वस्तू या बाजारांमध्ये उपलब्ध होतात. दादर स्थानकाच्या शेजारीच फुलाचा बाजार गेली अनेक वर्षे भरत आहे. येथे झेंडू, मोगरा, जास्वंद, गुलाब यांसारखी अनेक फुले उपलब्ध होतात. त्यात हा बाजार स्थानकाजवळ असल्याने नागरिकांना सोयीचे होते. यानंतर रानडे रस्त्यावरून जाताना दुतर्फा साडी, बॅग, चप्पल, घडय़ाळ, किराणा यांची दुकाने दिसतात. छबिलदासच्या गल्लीमध्ये तुम्हाला दिवाळीसाठी कंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तू दिव्यांची माळ सहज मिळते. गणेशोत्सवात येथे मखरांची मोठी स्वतंत्र बाजारपेठच खुली असते. छबिलदारच्या रस्त्यावरून डाव्या बाजूला वळले की घरासाठी आवश्यक वस्तू, किराणा स्टोअर्स आणि फराळही विकले जातात. यानंतर रस्ता ओलांडल्यावर सुरुवात होते ती महिलांच्या कपडय़ांची. पूर्वी या परिसरात पुरुषांच्या कपडय़ांसाठी काही मोजकीच दुकाने होती. आताही क्वचित पुरुषांच्या कपडय़ांची दुकाने दिसतील. या रस्त्यावर अनेक फेरीवाले कुडते, पंजाबी सूट घेऊन त्यांची विक्री करतात. येथील अधिकतर माल हा धारावी व उल्हासनगर येथून आलेला असतो. डिझायनर मात्र तरी परवडेबल खरेदीसाठी हे फेरीवाले सोयीचे ठरतात. पुढे पुढे जाल तसे तुम्हाला दिवाळीच्या फराळाची व मिठाईची दुकाने दिसू लागतील. पावले मागे घेत प्लाझा सिनेमागृहाच्या दिशेने गेलात तर तुमची साडय़ांची खरेदी जोरदार होईल. या संपूर्ण रस्ताभर मोठमोठी साडय़ांची दुकाने सज्ज असतात. लग्नसोहळ्यासाठी या परिसरातून साडी घेण्याची मजा काही औरच असते.
प्रत्येक खरेदीच्या ठिकाणी असलेल्या उपाहारगृहांमध्ये हमखास गर्दी दिसून येते. जोरदार खरेदी केल्यानंतर पोटाची तृष्णा पूर्ण करण्यासाठी आपण उपाहारगृहांची वाट शोधत जातो. दादरमध्ये मात्र तुम्हाला वाट वाकडी करून खाण्याचे पदार्थ शोधण्याची आवश्यकता नसते. या भागात पावलापावलावर चांगल्या खाद्यपदार्थाची दुकाने दिसतात. दादर स्थानकाजवळील पणशीकर मिसळ, मामा काणे लंच होम, आस्वाद, तृप्ती, श्रीकृष्ण, कैलास लस्सी, तांबे भुवन, पणशीकर मिठाई, कामत, गोमांतक, शिवाजी मंदिरजवळील पाणीपुरी-ताक, जिप्सी, जिप्सी कॉर्नर अशा असंख्य खाण्याची ठिकाणे आहेत. जेथे येऊन मुंबईकर विसावतात. त्याबरोबरच शिवाजी मंदिर, यशवंत नाटय़गृह, सिटीलाईट, प्लाझा यांसारखी मनोरंजनाची ठिकाणे असल्यामुळे दादर ग्राहकांच्या अधिकाधिक आवडीचा होत गेला. गेल्या काही वर्षांत येथे मॅकडोनल्ड, बर्गर किंग, मॅड ओव्हर डोनट यांसारख्या पाश्चात्य खाण्याच्या शाखा सुरू झाल्यामुळे तरुणांची या परिसरात मोठी गर्दी असते.
दिवसेंदिवस या परिसरातील गर्दी वाढतच चालली आहे. दादरचा बाजार सुरू होऊन सुमारे चार दशके पूर्ण झाली आहेत. मात्र लोकसंख्या जितकी वाढत आहे, त्या तुलनेत त्याचा विस्तार पद्धतशीरपणे झालेला नाही. गेल्या १० ते १५ वर्षांत या परिसरात दोन स्वतंत्र मॉल तयार करण्यात आले आहे. नक्षत्र व स्टार मॉल. या मॉलमध्ये सणांच्या दिवशी तुफान गर्दी असते. आपल्याकडील मॉल संस्कृती वाढत असल्याचे आपण मान्यच केले आहे. त्यातूनच हे दोन मॉल सुरू झाले. लवकरच काही नवीन सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या फेरीवाल्यांचे काय? एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावरील चेंगराचेंगरीनंतर पालिका व रेल्वेने फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या मोसमातच दादर पुलाखालील व छबिलदास मार्गाजवळील बाजारांतील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी तरी या भागात विक्री करणारे फेरीवाले दिसले नाही. मुंबईकरांसाठी ही बाब काही नवीन नाही. वर्षांनुवर्षे हा प्रकार सुरू असून हप्ता घेतल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांची गर्दी बाजारात दिसते. मात्र गेली अनेक वर्षे ग्राहकांची खरेदीची इच्छा पूर्ण करणाऱ्या या दादर पश्चिमेच्या बाजाराला कायदेशीर रूप कधी मिळेल. जर मुंबईच्या बाजारांवर कटाक्ष टाकला तर त्यातील प्रत्येक बाजारात कमी-जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे. हे रूप बदलण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे दिसून येते.
मीनल गांगुर्डे meenal.gangurde8@gmail.com