माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेस समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गदग एक्स्प्रेसच्या इंजिननं प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्यानं हा प्रकार घडला. धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे गदग एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिननं माटुंगा रेल्वे स्थानकात पाँडिचेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने धडक दिली. या दोन्ही एक्स्प्रेस एकाच वेळी दादरहून निघाल्या होत्या, मात्र, माटुंगा स्थानकावर पुढे असणाऱ्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने गदग एक्स्प्रेसनं धडक दिली.
दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पाँडिचेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमध्ये अद्याप कुणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, हा अपघात होण्यामागे नेमकं काय कारण ठरलं, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेविषयी देखील या अपघातानंतर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.