मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना कोकणातील एक्स्प्रेस बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी चालवली जाईल. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर पॅसेंजर १९९६-९७ पासून सुरू झाली. पुढे ती रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीचे असल्यामुळे आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ही गाडी सर्वाधिक लोकप्रिय होती. परंतु करोना काळात मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी सुरू करताना मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत बंद केली. त्यानंतर नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली. परंतु, रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली नाही. आता नव्या वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत दादर-गोरखपूर गाडी धावणार आहे. १ जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वेगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच या रेल्वेगाड्या आता कायमस्वरूपी झाल्या आहेत, असे मत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा…बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याची दुकानदारांना धमकावत वसुलीआरोपी अटकेत

राज्याला फटका

शून्य आधारित वेळापत्रकात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर, मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस अशा महाराष्ट्राच्या राज्यांतर्गत व इंटरसिटी रेल्वेगाड्या निवडून बंद करण्यात आल्या.

हेही वाचा…बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याची दुकानदारांना धमकावत वसुलीआरोपी अटकेत

मंत्र्यांकडूनही दुर्लक्ष

तीन वर्षांपासून कोकणातील नागरिकांनी रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच सकाळच्या वेळेत दादर-चिपळूण जलद पॅसेंजर सुरू करण्याची मागणी १० ते १५ वर्षांपासून करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी थेट रेल्वेमंत्र्यांकडे मागणी करूनही काहीही उपयोग झाला नाही. दिवा ते दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर गोरखपूर (चार दिवस) आणि दादर बालिया (तीन दिवस) विशेष रेल्वेगाड्या (दैनिक) सुरू केल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadar ratnagiri passenger closed and during that time dadar gorakhpur train will be operated permanently mumbai print news sud 02