मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वे रूळांचे जाळे प्रचंड गुंतागुंतीचे असून त्या मार्गावर लोकल, एक्स्प्रेसचा भार प्रचंड वाढला आहे. त्यात अनेक नव्या गाड्या सुरू झाल्या असून आणखी नव्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे मार्ग खुला नाही. त्यामुळे आता दादर-रत्नागिरी कायमस्वरूपी रेल्वेगाडी सुरू करणे अशक्य असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. त्यात सध्या सुरू करण्यात आलेली विशेष गाडी दादर-रत्नागिरी दरम्यान फक्त तीन दिवसांसाठी धावणार आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचा प्रकार घडल्याचे प्रवाशांचे मत आहे

होळीनिमित्त मध्य, कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. दादर-रत्नागिरी होळी विशेष रेल्वेगाडी ११ मार्चपासून धावू लागली आहे. तसेच १३ आणि १६ मार्च रोजी ती गाडी धावेल. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरीवरून १२, १४, आणि १७ मार्च रोजी दादरला जाणारी रेल्वेगाडी धावेल. त्यामुळे दादर, लालबाग, परळ, वरळी, माहीम, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली, भाईंदर, वसई, नालासोपारा, विरार, पालघर, घाटकोपर, कुर्ला, भांडुप, ठाणे या परिसरातील प्रवाशांना प्रवास करणे अडचणीचे ठरणार आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासून मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद केली. मात्र, ही एक्स्प्रेस बंद करून त्याच वेळेच्या मागे-पुढे दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येत आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर, शिवसेना (उबाठा) द्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, फक्त होळीनिमित्त तीन दिवसांसाठी विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. ही फसवणूक करण्यात आल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.

दादर रेल्वे स्थानकात दुपारच्यावेळी रेल्वेगाडी उभी करण्यास जागा नसणे, वक्तशीरपणा ढासाळणे असे प्रकार घडत असल्याने, दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी रद्द करून दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू केली. परंतु, कोकणातील एक्सप्रेस बंद करून उत्तरप्रदेशात जाणारी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येत आहे.

उपनगरीय रेल्वेला फटका

दादरवरून रत्नागिरी कायमस्वरूपी रेल्वेगाडी चालविल्यास अप आणि डाऊन १२ उपनगरीय रेल्वेसेवेला फटका बसेल. तसेच याचा परिणाम इतर लोकल सेवेवर होऊन लाखो प्रवाशांना प्रवास खोळंबा होईल. दादर-गोरखपूर रेल्वेगाडी थेट सरळ कल्याण मार्गे जाते. तर, दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी दिवा येथे वळण घेते. त्यात जादा वेळ जाऊन लोकलचा वक्तशीरपणा ढासळेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

दुपारी दादरवरून रत्नागिरीला जाणारी कायमस्वरूपी रेल्वेगाडी चालवण्याची मागणी होती. त्यानंतर मध्य रेल्वेने सध्या दादर ते रत्नागिरी दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्याची घोषणा केली. परंतु, जोपर्यंत दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस ते थेट रत्नागिरी अशी कायमस्वरूपी रेल्वेगाडी सुरू होत नाही. तोपर्यंत आरपारची लढाई कायम राहील.- विनायक राऊत, माजी खासदार

कोकणवासियांचे आंदोलन शांत करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठी चलाखी केली आहे. नियमित गाडीऐवजी फक्त तीन फेऱ्यांची एक्स्प्रेस सुरू केली. या एक्स्प्रेसचे थांबे तुतारी एक्स्प्रेसलाही आहेत. कोकण रेल्वे मार्गावर सर्व स्थानकांवर थांबणारी पॅसेंजर सुरू करण्याची आमची मागणी आहे. दादर-रत्नागिरी होळी विशेष रेल्वेगाडीला नियोजित थांब्याव्यतिरिक्त करंजाडी, सापे वामने, अंजनी, कडवई, दिवाणखवटी, नागोठणे, विन्हेरे येथे थांबा मिळावा. तसेच किमान ४ आरक्षित डबे उपलब्ध असावेत. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती

दादरवरून रत्नागिरी कायमस्वरूपी रेल्वेगाडी अद्याप सुरू झाली नाही. सध्या या मार्गावर विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येत आहे.- डाॅ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Story img Loader