पश्चिम रेल्वेवरील डहाणू लोकलला रविवारी १० वर्षे पूर्ण झाली असून डहाणू रेल्वे स्थानकात डहाणू लोकलचा दहावा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. डहाणू लोकल फुलांनी सजविण्यात आली होती. वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी समारंभात केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. तसेच, विरार – डहाणूदरम्यानच्या स्थानकांत प्रवासी आणि ग्रामस्थांनी या लोकलचे स्वागत केले.
आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर – ठाणेदरम्यान धावली. या घटनेला १७० वर्षे पूर्ण झाली. तर, विरार – डहाणूदरम्यान १६ एप्रिल २०१३ रोजी लोकल धावू लागली. त्यामुळे स्थानिकांना मुंबई गाठणे अधिक सोयीचे झाले. मुंबईतील कार्यालयात जाणारे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला या लोकलचा खूप फायदा होत आहे. आदिवासी, शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक उत्पादन, नाशवंतपदार्थ जलद गतीने बाजारपेठेत पोहचवणे शक्य होत आहे.
पश्चिम रेल्वेने नुकतेच १२ डब्यांच्या ११ विनावातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील विनावातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची एकूण १ हजार ३८३ वरून १ हजार ३९४ वर पोहोचली आहे. मात्र, डहाणूला जाणाऱ्या लोकलच्या एकाही फेरीचा त्यात समावेश नाही. त्यामुळे डहाणूला जाणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या पट्ट्यात लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विरार – डहाणू रोड चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असे मत पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.a