आयोजकांनी बांधलेल्या दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असली तरीही आम्ही ती फोडणार. त्यामुळे होणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका घेत दहीहंडी समन्वय समितीने चेंडू आयोजकांच्या कोर्टात ढकलून दिला. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही समन्वय समितीने दिला आहे. दरम्यान, समन्वय समितीच्या या भूमिकेमुळे मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गेली अनेक वर्षे दहीहंडी फोडून आम्ही हा उत्सव साजरा करीत आलो आहोत आणि तसाच तो यापुढेही साजरा करणार. मग त्यासाठी कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागले तरी चालेल. न्यायालयाचा अपमान करण्याचा आमचा इरादा नाही. न्यायालयात आमची बाजू मांडण्याची विनंती आम्ही सरकारला केली होती. परंतु सरकारने गोविंदा पथकांची बाजू योग्य पद्धतीने मांडलीच नाही. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला. राज्य सरकारने पुन्हा उच्च न्यायालयात आमचे म्हणणे मांडावे आणि या प्रश्नातून मार्ग काढून पथकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी केली. न्यायालयाच्या आदेशामुळे जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने अध्यादेश काढून या प्रश्नातून मार्ग काढून पथकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समन्वय समितीचे सल्लागार यशवंत जाधव यांनी केली. सरकारने तसे न केल्यास जन्माष्टमीला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि सरकारच त्याला सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशाराही जाधव यांनी दिला.
..तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ;समन्वय समितीचा इशारा
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने आपली चूक सुधारावी आणि अध्यादेश काढून या प्रश्नातून मार्ग काढून पथकांना दिलासा द्यावा. त्यासाठी कायदेतज्ज्ञांचे मत घ्यावे, अशी मागणी समन्वय समितीचे सल्लागार यशवंत जाधव यांनी केली. सरकारने तसे न केल्यास जन्माष्टमीला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि सरकारच त्याला सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशाराही जाधव यांनी दिला.
‘तर आयोजकांवर बहिष्कार टाकू’
दहीहंडी उत्सवातून अनेक आयोजक मोठे झाले. आता संकट येताच त्यांनी पळ काढायला सुरुवात केली आहे. या वर्षी उत्सावाचे आयोजन न करणाऱ्या आयोजकांवर कायमचा बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा समन्वय समितीचे सुरेंद्र पांचाळ यांनी दिला. गोविंदा पथकांसाठी दहीहंडी बांधून आयोजक मोठे झाले. संस्कृतीचे जतन करीत असल्याची टिमकी आयोजक वाजवत होते, पण संकट आल्यावर पहिल्यांदा आयोजकांनी पळ काढायला सुरुवात केली आहे. ही परंपरा जपण्यासाठी आयोजकांनी दहीहंडीचे आयोजन करायलाच हवे. पाहिजे तर बक्षिसाची रक्कम कमी करा, पण उत्सव बंद करू नका, असे आवाहन यशवंत जाधव यांनी केले.