पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवांना पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता दहीहंडी उत्सवांवरील विघ्न टळले असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी जाहीर केले. यासंदर्भात आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसह बैठक घेतली होती.
उत्सव आयोजकांसमोर येणाऱ्या अडचणी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. आयोजकांना कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस आणि महापालिका यांच्याकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी शेलार यांनी केली. उत्सव साजरे करण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने लोकांमध्ये उत्सव साजरे होणार अथवा नाही, असा संभ्रम आहे. तो दूर करण्याची गरज शेलार यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून उत्सव आनंदाने व उत्साहानेच साजरे व्हावेत, अशीच प्रशासनाची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. उत्सवासाठी आयोजकांना प्रशासनाचे सहकार्य राहील आणि कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरे करणाऱ्यांना कोणतीही आडकाठी करण्यात येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सवावरील विघ्न टळले!
पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवांना पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता दहीहंडी उत्सवांवरील विघ्न टळले ..
First published on: 26-08-2015 at 04:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi festival issue solved says ashish shelar