गोविंदा पथकांनी आयोजकांकडून पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम, सोन्याची नाणी, गाडी आदी न स्वीकारता केवळ चषक घ्यावा, असे आवाहन ‘दहीहंडी समन्वय समिती’ने शनिवारी मुंबई-ठाण्यातील समस्त पथकांना केले. तसेच, अचकटविचकट नृत्य सादर करण्याऱ्या सेलिब्रेटींवर पैसे उधळण्याऐवजी तो पैसा जखमी गोविंदांना मदत म्हणून द्यावा, असे आवाहन करीत त्यांनी आयोजकांचीही कानउघाडणी केली आहे.
दहीकाला!
गोविंदा रे गोपाळा
ठाण्यात मात्र दहा थरांसाठी २५ लाखांचे आमिष
दहीहंडी उत्सव आकर्षक करण्यासाठी सेलिब्रेटींना लाखो रुपये दिले जातात. आयोजकांनी सेलिब्रेटींवर पैशांची उधळण करण्याऐवजी ती रक्कम जखमी गोविंदांना मदत म्हणून द्यावी. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळेल, असे आवाहन समितीचे बाळा पडेलकर यांनी केले.
दहीहंडी उत्सवाला व्यावसायिक आणि बाजारू स्वरूप आल्याची टीका सातत्याने होते आहे. यात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी भविष्यात येणाऱ्या नियमावलीचा धसका घेऊन समितीने आतापासून सावध पवित्रा घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी उत्सवाला बाजारूस्वरूप आल्याची जाहीर कबुली समितीचे अध्यक्ष पडेलकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. ‘पैशांच्या आमिषापोटी उंच दहीहंडय़ा फोडण्याची चुरस पथकांमध्ये सुरू असल्याची बोचरी टीका करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हा उत्सव पूर्वीसारखाच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी रोख रकमांच्या पारितोषिकांऐवजी चषक मिळायचे. यंदा आयोजकांनी रोख रकमांऐवजी दहीहंडी फोडणाऱ्या पथकास चषक द्यावा. रोख रक्कम, गाडी, सोन्याची नाणी पथकांनी स्वीकारू नयेत. मुंबई-ठाण्यातील सुमारे १२०० पैकी ८०० पथकांची नोंदणी दहीहंडी समन्वय समितीकडे झाली आहे. यापैकी बहुसंख्य गोविंदा पथके या निर्णयाशी सहमत असून असंघटित गोविंदा पथकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत,’ असे बाळा पडेलकर यांनी सांगितले.
उत्सवाचे आयोजक, पुरस्कर्त्यांकडे हात पसरण्यापेक्षा गोविंदांकडून वर्गणी काढून प्रत्येक पथकाने हा उत्सव साजरा करावा. या वर्गणीतूनच गोविंदांचा नाश्ता, जेवण आणि प्रवासखर्च भागवावा, असे आवाहनही त्यांनी केले तर ‘प्रत्येक पथकाने आपल्या क्षमतेनुसार थर रचावेत. परस्परांमधील स्पर्धा टाळावी. त्यामुळे अपघात टळतील आणि उत्सव अधिक सुरक्षित होईल,’ असे समन्वय समितीचे सरचिटणीस अरुण पाटील यांनी सांगितले.
पळपुटय़ा आयोजकांवर बहिष्कार
मुंबई उच्च न्यायालयाने र्निबध घालताच मुंबई-ठाण्यातील अनेक आयोजकांनी उत्सवाचे आयोजन रद्द करून पळ काढला. अशा पळपुटय़ा आयोजकांवर समन्वय समितीने बहिष्कार टाकला आहे. मात्र त्यांच्याकडे दहीहंडी फोडायला जायचे की नाही हे प्रत्येक पथकाने ठरवावे, असे बाळा पडेलकर म्हणाले.
बाल गोविंदा दहीहंडी फोडणार नाही
बालहक्क आयोगाने १२ वर्षांखालील बाल गोविंदांना दहीहंडी फोडण्यावर घातलेले र्निबध सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. दहीहंडी उत्सवाचे बाल गोविंदांना आकर्षण असते. त्यामुळे आम्ही त्यांना पथकात सहभागी करून घेणार आहोत. पण दहीहंडी फोडताना त्यांचा थरांमध्ये समावेश करण्यात येणार नाही, असे बाळा पडेलकर यांनी स्पष्ट केले. एकूणच नियमावलीचा धसका चांगलाच घेतला असल्याचे दिसत आहे.