गोविंदांकडून नियमांचा ‘गोपाळा’
दहीहंडीची उंची आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांच्या सहभागाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेले र्निबध धुडकावून मुंबई-ठाण्यात अनेक गोविंदा पथकांनी नऊ थर रचून सलामी दिली आणि आदेशाचा ‘काला’ करत हंडय़ा फोडल्या. अनेक ठिकाणी थरामध्ये सहभागी होत बाल गोविंदांनी आदेशांचा भंग केला. तर रस्त्यावर झोपून नऊ थर रचून, काळी निषाणे फडकवून, डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थर उभारून, तर शिडीवर चढून दहीहंडीचा वेध घेत गोविंदा पथकांनी र्निबधांच्या विरोधात आपला निषेध नोंदविला. आदेश धुडकाविण्यात महिला गोविंदा पथकेही आघाडीवर होती. मात्र काही ठिकाणी न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जखमींची संख्या घसरली आहे.
दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश कायम केले आहेत. असे असतानाही कुलाबा, गिरगाव, ग्रॅन्टरोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, परळ, चेंबूरसह अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी सहा, सात, आठ थर रचून सलामी देत न्यायालयाचे आदेश धुडकावून लावले. गिरगाव, दादरमध्ये गोविंदा पथकांनी दहीहंडीखाली रस्त्यावर झोपून आठ थर रचत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा निषेध केला. अखिल माझगाव ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदा पथकाने दादरमध्ये बाजूबाजूला चार, चार थर रचून काळी निशाणे फडकवित र्निबधांचा निषेध केला. तर काही ठिकाणी पथकांनी चक्क शिडीवर चढून दहीहंडीचा वेध घेतला.
ठाण्यात मनसेच्या शहराध्यक्षावर गुन्हा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला थेट आव्हान देत ठाण्यातील भगवती शाळेच्या मैदानात मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दहीहंडी उभारली होती. एकीकडे दहीहंडीच्या ठिकाणी गोविंदा पथक तसेच प्रेक्षकांची गर्दी वाढली होती, तर दुसरीकडे गोविंदा पथके नऊ थर लावण्याची तयारी करीत होते. काही गोविंदा पथकांत लहान मुलांचा समावेश होता. या पाश्र्वभूमीवर नौपाडा पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह जय जवान मंडळ आणि इतरांवर गुन्हा दाखल केला.
महिला पथकांकडूनही नियमभंग
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकाविण्यात महिला गोविंदा पथकेही आघाडीवर होती. विलेपार्ले स्पोर्टस् क्लबच्या महिला गोविंदा पथकांनी सहा थर रचून सलामी दिली आणि त्यानंतर नियमानुसार २० फुटांवर असलेली दहीहंडी फोडली. तर अनेक महिला गोविंदा पथकांमधील १८ वर्षांखालील गोपिकांनी थरामध्ये सहभागी होत न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करण्यात आली. न्यायालयाचे आदेश धुडकावून गोविंद पथकांनी चारहून अधिक थर रचत निषेध व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आपल्याकडून होऊ नये याची काळजी घेत काही आयोजकांनी उत्सवस्थळी २० फुटांवर दहीहंडी बांधली होती. चार थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे आणि नियमानुसार दहीहंडी फोडावी असे वारंवार आयोजकांकडून जाहीर करण्यात येत होते. तसेच केवळ चार आणि पाच थरांसाठीच पारितोषिके दिली जात होती. त्यामुळे अधिक थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना पदरात पडेल ते पारितोषिक घेऊन परतावे लागत होते.