ठाण्यातील अंध, अपंग, कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने साजरा केला जाणारा दहीहंडीचा कार्यक्रम निधीअभावी रद्द झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जाग्या झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी घाईघाईने हा कार्यक्रम आयोजित करून मनाची ‘श्रीमंती’ दाखवून दिली. मात्र या प्रकारामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाटय़ावर आली आहे.
शिवसेनेचे उपशहरप्रमुख विलास ढमाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दहीकाल्याच्या आदल्या दिवशी शिवाजी मैदानात ही हंडी आयोजित करतात. या उत्सवात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातून सुमारे पाचशेहून अधिक अपंग विद्यार्थी सहभागी होतात. या विद्यार्थ्यांना अल्पोपाहार, जेवण तसेच भेटवस्तूंची व्यवस्थाही मंडळाद्वारे केली जाते. येथील बाळगोपाळ मित्र मंडळातर्फे गेली २८ वर्षे या उत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून हे आयोजन शिवसेनेचे उपशहरप्रमुख ढमाले यांनी आपल्या खांद्यावर घेतले. मात्र यंदाच्या वर्षी या उत्सवासाठी दीड लाख रुपयांचा निधी उभारणे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना अशक्य झाल्याने हा उत्सव बंद करण्याचा निर्णय झाला. याबाबतच्या वृत्ताने लाखो रुपयांची उधळपट्टी करून दहीहंडय़ा रचणारे ठाण्यातील शिवसेनेचे आमदार, नेते करतात काय, असा प्रश्न उपस्थित झाला. वरिष्ठांकडून कानउघाडणी होताच स्थानिक नेत्यांनी शनिवारी घाईघाईने निधीची जमवाजमव करून दहीहंडी उत्सवासाठी नोंदणी केलेल्या १२ शाळांमधील ४५० विद्यार्थी, शिक्षकांना पाचारण करून उत्सव साजरा केला. सहभागी अपंग विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा