महाराष्ट्र सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये मुख्य सचिव सीताराम कुंटे टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई यांनी दहीहंडी पथकांच्या अधिकाऱ्यांना या उत्सवामधून करोनाचा फैलाव कसा होऊ शकतो यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याच माहितीमुळे समन्वय समितीला सरकारची भूमिका पटली. मात्र या जाणकारांनी या बैठकीमध्ये नक्की काय सांगितलं जाणून घेऊयात…

दहीहंडीच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग सहभागी होतो. हा तरुण वर्ग ३५ वर्ष वयोगटाच्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पुर्णपणे लसीकरण झालेले नसल्याचे आयुक्त चहल यांनी या बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटने तसेच नीती आयोगाने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याची माहिती दिली. बहृन्मुंबई पोलीस आयुक्त नगराळे यांनी आयुक्तांच्या सुचनेला दुजोरा दिला. करोनाकाळात गणेशोत्सवासह सर्व सण साधेपणाने साजरे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नक्की वाचा >> ‘दहीहंडी साजरी करणारच’ म्हणणाऱ्या राम कदमांना समन्वय समितीचा टोला; मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत म्हणाले…

डॉ. ओक काय म्हणाले?

डॉ. संजय ओक यांनी दहिहंडीचा उत्सव हा अतिशय जवळून, एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहे, या खेळात मानवी थर रचले जात असतांना एकमेकांना जवळून स्पर्श होतो, थर लावतांना अंगावर पाणी टाकले जाते, पावसाळा सुरु आहे, पाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते हे सांगतांना त्यांनी डेल्टा प्लस हा विषाणु घातक असून तो वेगाने पसरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. दहिहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. करोनाने आज ही आपण आपले आप्तस्वकीय गमावत असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि हा सण आपण रक्तदान, औषधे आणि करोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करू, आपल्या उत्सवाचे ‘स्पिरिट’ वेगळ्या पद्धतीने जपू असे आवाहन केले.

नक्की वाचा >> जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊयात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इतर तज्ज्ञांनी काय मत मांडलं?

डॉ. पंडित यांनी हा सण आपला आवडता असला तरी करोनामुळे तो आपल्या तो साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले विविध देशात ज्यांच्या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत तेथे करोनाच्या तिसऱ्या लाटेने घेतलेल्या भयानक स्थितीची माहिती दिली.

हा उत्सव गर्दीत आणि अतिशय जवळून मानवी संपर्कातून साजरा होतो जो करोना संसर्ग वाढवण्याला कारणीभूत ठरू शकतो असे सांगून डॉ. जोशी म्हणाले की, आता कुठे आपण दुसरी लाट काही ठिकाणी नियंत्रणात आणू शकलो आहोत, अर्थचक्र सुरु करण्यासाठी काही निर्बंध शिथील करू शकलो आहोत, त्यामुळे आपल्याला संसर्ग वाढवून चालणार नाही. डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई यांनी देखील यावेळी आपली भूमिका विशद केली.

कोणकोण उपस्थित होतं?

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक,  माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे,  महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ. अजित देसाई, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, दहिहंडी समन्वय समितीचे  पदाधिकारी, गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

Story img Loader