केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे तर देशाबाहेरही लौकिक मिळविलेल्या दहीहंडीला आता खऱ्या अर्थाने राजमान्यता मिळणार आहे. या खेळाचा साहसी खेळ म्हणून क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.
दहीहंडी उत्सवाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, केवळ मुंबई पुण्यासारख्या शहरी भागापुरतीच या खेळाची लोकप्रियता मर्यादित राहिली नसून तो अगदी स्पेनपर्यंत पोहोचला आहे. राज्यात सध्या जवळपास १० हजार दहीहंडय़ा बांधल्या जातात, तर त्या फोडण्यासाठीच्या गोविंदा पथकांमध्ये दीड ते दोन लाख तरूण सहभागी होत असतात. या उत्सवाच्या माध्यमातून कोटय़वधी रूपयांची उलाढाल होत असली तरी त्यात आपले कौशल्य दाखविणाऱ्या युवकांना मात्र अद्याप राजाश्रय मिळालेला नाही. त्यामुळे दहीहंडी हाही एक क्रीडा प्रकार म्हणून राज्य शासनाने जाहीर करावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. राज्य सरकारनेही आता या मागणीची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार दहीहंडीला  खेळाचा दर्जा देण्याबाबत क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस मोठय़ा दहीहंडीचे आयोजक तसेच गोविंदा पथकांचे नेते सचिन अहिर, भाई जगताप, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, राजन विचारे तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी दहीहंडीलाही खेळाचा दर्जा आणि सुविधा या खेळात सहभागी होणाऱ्या तरूणांना देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
वळवी यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.