दहीहंडीच्या थरांवरून सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. दहीहंडीसाठी मोठे मोठे थर रचणाऱयांनी स्वतः दहाव्या थरावर जाऊन दाखवावे, मी त्यांना एक कोटींचे बक्षिस देईन, असे वक्तव्य सरनाईक यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्याला लगेचच आव्हाड यांनी आपल्या ‘संघर्ष’ प्रतिष्ठान दहीहंडी कार्यक्रमाच्या ठिकाणीच प्रत्युत्तर दिले. आम्ही मैदान सोडून पळून जात नाही, असे सांगत त्यांनी सरनाईकांच्या आरोपांना लगोलग प्रत्युत्तर दिले.
आव्हाड यांचे थेटपणे नाव न घेता सरनाईक यांनी त्यांना टोला लगावला. सरनाईक म्हणाले, गोविंदांची काळजी घेतो म्हणणारे प्रत्यक्षात राजकारण करीत आहेत. मोठे थर रचणाऱयांनी स्वतः दहाव्या थरावर जाऊन दाखवावे, मी त्यांना एक कोटींचे बक्षिस द्यायला तयार आहे.
आव्हाड यांनी आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मला आव्हान देऊ नका बाळानो. मी तुमचा बाप आहे. आम्ही मैदान सोडून पळून जात नाही, असे आव्हाड म्हणाले.