प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : दहीहंडीचे थर कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्या गोविंदांच्या कुटुंबियांना तसेच जखमी गोविंदांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या दहीहंडी उत्सव समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटनेतील वाद विकोपाला गेले असून समन्वय समितीच्या कार्यकारिणीतील सदस्यांची स्पेनवारी या वादात कळीचा मुद्दा ठरली आहे. परिणामी, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील समस्त दहीहंडी पथकांनी या संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र समन्वय समितीच्या कार्यकारिणीने मात्र सदस्यत्व देण्याबाबत मिठाची गुळणी घेतली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या तोंडावर वाद चिघळून समन्वय समितीची घागर उताणी पडण्याची चिन्हे आहेत.
उंच दहीहंडी फोडण्यासाठी सुरू झालेली स्पर्धा, सरावाशिवाय उंच मानवी थर रचण्याचे प्रयत्न, मद्यधुंद अवस्थेत गोविंदा पथकात सहभागी होणारे हुल्लडबाज तरूण, मानवी थर कोसळून होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या असे अनेक प्रश्न २००० च्या सुमारास भेडसावू लागले होते. दहीहंडी फोडताना मृत्युमुखी पडणाऱ्या गोविंदाच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी, तसेच जखमी होणाऱ्या गोविंदांना आर्थिक मदत करण्यासाठी मुंबईमधील काही उत्सवप्रिय राजकीय नेते मंडळींनी गोकुळाष्टमी ट्रस्टची स्थापना केली. कालौघात मुंबईतील काही मोठ्या गोविंदा पथकांतील सदस्य या ट्रस्टसाठी काम करू लागले. हळूहळू पथकांचा ट्रस्टमधील सहभाग वाढू लागला आणि राजकीय मंडळींनी ट्रस्टची सर्व जबाबदारी या पथकांवर सोपविली. अखेर २०१३-१४ मध्ये हे ट्रस्ट बंद करण्यात आले आणि दहीहंडी उत्सव समन्वय समिती, महाराष्ट्र या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीची काही वर्षे नव्या संस्थेचा कारभार समन्वयाने, गुण्यागोविंदाने सुरू होता. त्यानंतर २०१८ मध्ये दहीहंडी उत्सव समन्वय समिती, महाराष्ट्रची धर्मादाय कार्यालयात नोंदणी करण्यात आली.
आणखी वाचा-व्यावसायिकाकडे ९० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अग्निशमन अधिकाऱ्याला अटक
मुंबईमधील उंच दहीहंडी फोडणाऱ्या, तसेच नामांकीत पथकांतील सदस्यांची समन्वय समितीच्या कार्यकारिणीमध्ये वर्णी लागली. काही वर्षांपूर्वी दहीहंडीच्या उंचीवर घालण्यात आलेले निर्बंध तसेच लहान मुलांच्या थरातील सहभाग यासंतर्भात वाद निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने काही निर्बंध उत्सवावर घातले होते. मात्र याविरोधातील लढाईत समन्वय समिती आणि समस्य गोविंदा पथके एकसंघपणे लढली. दरम्यानच्या काळात स्पेनमधील मानवी थर रचण्याची स्पर्धा मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांना आकर्षित करू लागली होती. काही राजकारण्यांच्या मदतीने गोविंदा पथकांतील निवडक सदस्यांनी स्पेनवारी केली. गोविंदा पथकांना स्पेनवारीचा योग गेली अनेक वर्षे घडून येत आहे. मात्र गेल्या वर्षीची स्पेनवारी वादग्रस्त ठरली आहे.
गेल्यावर्षी स्पेनला गेलेल्यांमध्ये समन्वय समितीच्या कार्यकारिणीतील सदस्य आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या अधिक होती. ही बाब अन्य गोविंदा पथकांच्या निदर्शनास आल्यानंतर समन्वयात वादाची ठिणगी पडली आहे. समन्वय समितीची बैठक बोलावून याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी समस्त गोविंदा पथकांकडून होऊ लागली होती. अखेर वाद विकोपाला जाऊ नये यासाठी ३० ऑक्टोबर २०२२ रोजी समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र ही बैठक वादळी ठरली. मुद्दे उपस्थित करणारी गोविंदा पथके समितीची सदस्य नसल्याची बाब निदर्शनास आणून त्यांच्या प्रश्नांना कार्यकारिणीने बगल देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वाद अधिकच विकोपाला गेला.
आणखी वाचा- ‘आमच्यावर टीका करा, आई-वडिलांबद्दल बोलू नका’
समन्वय समितीच्या कार्यकारिणीचा कार्यकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे नियमानुसार निवडणुकीद्वारे नवी कार्यकारिणी स्थापन होणे गरजेचे आहे. मात्र १५ ते २० गोविंदा पथकेच समन्वय समितीची सभासद असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील गोविंदा पथकांमध्ये खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीत झालेल्या बैठकीनंतर सातत्याने गोविंदा पथके सभासदत्वाच्या अर्जाची मागणी समितीकडे करीत आहेत. परंतु अर्जच देण्यात येत नसल्याने पथकांना सभासद होता आलेले नाही. गोविंदा पथकांच्या वॉट्स ॲप ग्रुपवर काही गोविंदांनी सभासदत्वाच्या अर्जाची मागणी केली आहे. या ग्रुपमध्ये जवळपास १९४ पथकांचे सदस्य आहेत. त्यापैकी ११० गोविंदा पथकांनी समन्वय समितीचे सदस्य होण्याची इच्छा व्यक्त करीत अर्जाची मागणी केली आहे. मात्र कार्यकारिणी सदस्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सवाच्या तोंडावर समन्वय समितीची शकले होण्याचीच शक्यता आहे.
दरम्यान, या संदर्भात विचारणा करण्यासाठी दहीहंडी उत्सव समन्वय समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आमचे पथक समन्वय समितीचे सदस्य नसल्याने कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असे समन्वय समितीच्या कार्यकारिणी सदस्याने मागील बैठकीत सांगितले. मग इतकी वर्षे समन्वय समितीसाठी आम्ही झटलो त्याचे काय ? काही वर्षांपूर्वी आमच्याकडून प्रतिज्ञापत्रे आणि सभासदत्व देण्यासाठी पैसे घेतले होते. त्याचे काय झाले ? गोविंदा पथकांची ही फसवणूक आहे. गोविंदा पथकांना सदस्य व्हायचे आहे. त्यांना तातडीने अर्ज द्यावा. सातत्याने ही मागणी करण्यात येत आहे. पण अर्ज देण्यात आलेले नाहीत. -निलेश वैती, जतन गोविंदा उत्सव पथक, ठाणे