मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पहिला मतदारसंघ असलेल्या दहिसर मतदारसंघात यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दहिसर या एकमेव मतदारसंघात भाजपला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. शिवसेनेत (उद्धव ठाकरे) ४० वर्ष कार्यरत असलेले विनोद घोसाळकर आणि गेली दहा वर्षे आमदार असलेल्या भाजपच्या मनीषा चौधरी यांच्यात ही लढत होणार आहे.
दहिसर मतदारसंघात यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विनोद घोसाळकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. घोसाळकर हे २००९ मध्ये या मतदारसंघाचे आमदार होते. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये मनीषा चौधरी यांनी घोसाळकर यांचा पराभव करून या मतदारसंघावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती होती व त्यात या मतदारसंघात पुन्हा मनीषा चौधरी यांना संधी देण्यात आली होती. मूळच्या पालघरच्या असलेल्या चौधरी यांनी या मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आव्हान या मतदारसंघात आहे. घोसाळकर हे जुने जाणते राजकारणी आहेत. फेब्रुवारी महिन्यात घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक यांची हत्या झाली होती. या घटनेमुळे दहिसरमध्ये मोठी खळबळ उडाली होती. घोसाळकर कुटुंबाविषयी दहिसरकरांच्या मनात सहानुभूती आहे. या सहानुभूतीचाही घोसाळकर यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
र
घोसाळकर हे शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) एक मोठे नेते असून गेल्या काही वर्षात त्यांनी पक्षातील आपल्या विरोधकांनाही राजकीयदृष्ट्या संपवल्याची या विभागात चर्चा आहे. त्यामुळे या विभागात शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) दुसरी फळी नसल्याची चर्चा आहे. मात्र घोसाळकर यांनी या निवडणुकीचा प्रचार खूप जोमाने सुरू ठेवला आहे. प्रचारामध्ये पत्रकांवर पुत्र अभिषेक आणि स्नुषा तेजस्वी यांची छायाचित्रेही ठेवण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाले तेव्हा तेजस्वी यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती, मग विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा सरू झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या संभ्रमाचाही फटका घोसाळकर यांना बसू शकतो अशीही इथे चर्चा आहे. कोणाचाही नाहक बळी जाणार नाही, कोणाचेही सौभाग्य हिरावून घेतले जाणार नाही, असे सूचक वचन त्यांनी आपल्या वचननाम्यात दिले आहे. दहशतवाद गुंडगिरीवर कायमचे नियंत्रण आणणार असेही वचन त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या भावनिक आवाहनाचा मतदारांवर किती प्रभाव पडतो ते निवडणुकीतच समजू शकणार आहे.
हेही वाचा : कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
दहिसरमध्ये मराठी, कोळी, ख्रिश्चन अशी संमिश्र लोकवस्ती आहे. यापैकी मराठी समाज तसेच विशेषत: आयसी कॉलनीतील ख्रिश्चन समाज हा शिवसेनेबरोबर, घोसाळकरांच्या पाठीशी असतो. तसा तो यावेळी असेल अशी शक्यता आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे ही पारंपरिक मते घोसाळकरांनाच मिळतील अशीही शक्यता आहे. त्यामुळे या भागात भाजप आणि शिवसेना यांच्यात कडवी झुंज होण्याची शक्यता आहे.
२००९
विनोद घोसाळकर (शिवसेना) – ६०,०६९
योगेश दुबे (कॉंग्रेस) – ४३,९१३
२०१४
मनीषा चौधरी (भाजप) – ७७,२३८
विनोद घोसाळकर (शिवसेना) – ३८,६६०
हेही वाचा : विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
२०१९
मनीषा चौधरी (भाजप) – ८७,६०७
अरुण सावंत (कॉंग्रेस) – २३६९०