मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आरे मेट्रो स्थानक येथे शनिवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री ८ वाजता या मार्गिकेवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. रात्री दहापर्यंत मेट्रोच्या १० ते १२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. रविवारपासून मात्र सकाळी ६ ते रात्री १० अशी वेळापत्रकानुसार मेट्रो धावणार आहे. ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही मार्गिकेचा मिळून एकूण २०.७३ किमीचा हा टप्पा असणार आहे. या मार्गावर स्वयंचलित ११ मेट्रो गाडय़ा धावणार आहेत. असे असले तरी सुरुवातीचे काही महिने मेट्रोचालक (मेट्रो पायलट) मेट्रो गाडय़ा चालविणार आहेत. त्यानंतर विनाचालक गाडय़ा धावणार आहेत. मात्र  त्या मेट्रो चालकांच्या देखरेखीखालीच चालतील, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

रात्री ८ वाजता प्रवासी सेवा सुरू

 शनिवारी मेट्रोचे उद्घाटन होणार असले तरी रविवारपासून या मार्गिकेवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे गुरुवारी श्रीनिवास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी मात्र यात बदल करुन उद्घाटन झाल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून या मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी रात्री आठ ते दहा या वेळेत प्रवासी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. एकूणच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच मुंबईकरांना नव्या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करता येणार आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध प्रकल्पांचा आरंभ

मुंबई : शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत विविध प्रकल्पाच्या उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा धडका असणार आहे. यात मुंबईकरांच्या सेवेत नवीन मेट्रो मार्गिका येईल. याशिवाय वडाळा येथील जीएसटी भवनाचे आणि मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन, डायल ११२ आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंधक केंद्रांचे उद्घाटनही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री करतील. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वडाळय़ातील ३८,१७१.५८ चौ. मी. जागेवर जीएसटी भवन उभारण्यात येत आहे. वस्तू व सेवा कर विभागासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्याची गरज लक्षात घेता जीएसटी भवनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या भवनाच्या उभारणीची जबाबदारी एमएसआरडीसीला देण्यात आली. यासाठी १,८१० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सरकारकडून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.  या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी सकाळी ९ वाजता वडाळा येथे होईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींची उपस्थिती असणार आहेत.

मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा भवन बांधण्यात येणार आहे. या भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होईल. यावेळी उपमुख्यमंत्री यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री, मराठी भाषा डॉ विश्वजित कदम, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख आदींची उपस्थिती असेल. या कार्यक्रमानंतर दुपारी साडे बारा वाजता महाराष्ट्र सायबर विभागाच्या डायल ११२ आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंधक केंद्राचेही मुख्यमंत्री उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी चार वाजता मेट्रो २ आणि ७ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahisar to aarey metro service today inauguration chief minister uddhav thackeray ysh