मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’  आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ या मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या अखेर दोन लाखांपार पोहोचली आहे. या दोन्ही मार्गिकांवर मंगळवारी एकूण २ लाख ३ हजार ५८१ मुंबईकरांनी प्रवास केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. तर दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी सेवेत दाखल झाला. पहिल्या टप्प्यात या मार्गिकांवरून दिवसाला सरासरी ३० हजार ५०० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र दुसऱ्या टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. त्यानंतर प्रवासीसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्यामुळेच जानेवारी २०२३ मध्ये प्रतिदिन प्रवासीसंख्या थेट १ लाख ६० हजारांवर पोहोचली. तसेच एप्रिल २०२२ ते जून २०२३ दरम्यान एकूण प्रवासीसंख्या तीन कोटींवर पोहोचली.

हेही वाचा >>> करोना केंद्रामधील कथित गैरव्यवहारप्रकरण : जे. जे. रुग्णालयातील औषध चाचणी समितीमध्ये डॉ. अमिता जोशी

या दोन्ही मार्गिकांचे संचलन महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळातर्फे (एमएमएमओसीएल) करण्यात येत आहे. प्रवासीसंख्या वाढावी आणि प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमएमओसीएल वेळोवेळी विविध उपाययोजना करीत आहे. तसेच नव्या सुविधाही उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रवासीसंख्या वाढण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासीसंख्या १ लाख ६६ हजारांवर पोहोचली होती. आता प्रवासीसंख्येने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून दैनंदिन प्रवासीसंख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या प्रवासीसंख्येबाबत महानगर आयुक्त तथा एमएमएमओसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात प्रवासीसंख्येत आणखी वाढ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

‘मुंबई १ कार्डला’ही चांगला प्रतिसाद

प्रवाशांचा मेट्रो प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमएमओसीएने एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सेवा सुरू केली आहे. या कार्डमुळे तिकिटासाठी रांगेत उभे रहावे लागत नाही. या कार्डवर अनेक सवलतीही दिल्या जात असून या कार्डचा वापर बेस्ट बस प्रवासासाठी करता येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या कार्डला पसंती मिळत आहे. आतापर्यंत एक लाख १४ हजार १७१ प्रवाशांनी ‘मुंबई १ कार्डा’चा लाभ घेतला आहे.

Story img Loader