मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता धरणातील विसर्गातून वाहून जाणारे पाणी वाचवण्याचे ठरवले आहे. त्याकरीता मध्य वैतरणा धरण आणि मोडक सागर धरणाच्या दरम्यान बंधारा बांधून पाणी साठवले जाणार आहे. त्याचबरोबर विहार तलावातून वाहून जाणारे पाणीही भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतून मुंबईला दर दिवशी ३,९५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मुंबईची लोकसंख्या वाढत असून सातही धरणे काठोकाठ भरली तरी वर्षभर हे पाणी पुरत नाही. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पांचे काम रखडले आहे. मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे. मात्र या धरणाच्या परवानग्यांसाठी वेळ लागणार आहे.

हेही वाचा – आनंद दिघे यांच्या नावाने स्थापन मंडळाला रिक्षा चालक-मालक संघटनांचा विरोध

तातडीची उपाययोजना म्हणून पालिकेने आता धरणाच्या विसर्गातून वाया जाणारे पाणी वाचवण्याचे ठरवले आहे. गेल्या दोन – तीन वर्षांपासून उन्हाळा सुरू झाला की धरणे आटू लागतात व जून महिन्यात पाणी कपात करावी लागते. त्यानंतर पावसाळा सुरू झाला की महिन्याभरात धरणे काठोकाठ भरतात. धरणे एकदा भरली की मग धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागतो. धरणांतील पाणी साठवण क्षमता संपल्यामुळे पाणी वाहून घालवावे लागते. त्यामुळे आता हे पाणी वाचवण्याचे मुंबई महानगरपालिकेने ठरवले आहे.

मध्य वैतरणा धरण आणि मोडक सागर धरणाच्या दरम्यान असलेल्या जागेत बंधारा बांधून मध्य वैतरणा धरणातून विसर्गाद्वारे सोडले जाणारे पाणी अडवले जाणार आहे. या कामासाठी पालिकेने सल्लागार नेमले असून या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार असल्याची माहिती पालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. यावर्षी हे धरण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात भरले होते. त्यामुळे महिनाभर पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. हे पाणी वाचवून मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – Atal Setu Suicide : अटल सेतूवरून उडी घेत ५२ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या; तीन दिवसांत दुसरी घटना

विहार तलावाचे पाणी वळवणार

पावसाळ्यात मुंबईच्या हद्दीतील विहार तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्याच्या सांडव्याचे पाणी मिठी नदीच्या पात्रात वाहून जाते. त्यामुळे हे पाणी वाया जातेच, पण मिठी नदीची पातळीही वाढते व शहरात पूरस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून विहार तलावातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये वहन करण्यात येणार आहे. त्याकरीता भांडूप जलशुद्धिकरण प्रकल्पामध्ये २०० दशलक्ष लीटर क्षमतेचे उदंचन केंद्र बांधण्यात येणार आहे. या कामासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे.