मुंबई : मुंबईत बुधवारपासून पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. या सातही धरणांमध्ये एकूण ५.३२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरण क्षेत्रात पावसाने ओढ दिल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी पहाटेपर्यंत सातही धरणांमध्ये केवळ १६२ मिमी पावसाची नोंद झाली झाली.

धरणांतील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे, भिवंडी – निजामपूर महानगरपालिका व आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. समाधानककारक पर्जन्यमान होऊन धरणांतील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३८०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. हवामान विभागाने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाची स्थिती समाधानकारक नसल्याने मुंबईकरांच्या पाणीचिंतेत वाढ होत आहे. जून महिन्यातील पहिला पंधरवडा सरल्यानंतरही धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सातही धरणांमध्ये आता केवळ ५.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा…मुंबईकर साथीच्या आजाराने त्रस्त, स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ऊर्ध्व वैतरणामध्ये १० मिमी, मोडकसागरमध्ये २३ मिमी, तानसामध्ये ३८ मिमी, मध्य वैतरणामध्ये १८ मिमी, भातसामध्ये १० मिमी, विहारमध्ये १५ मिमी, तुळशीमध्ये ४९ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी २० जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तानसा जलाशय वगळता इतर धरणांमध्ये पाऊस पडला नव्हता. तानसामध्ये केवळ १ मिमी पाऊस पडला होता. मात्र, सातही धरणांची पाणीपातळी यंदाच्या तुलनेत अधिक होती. त्यामुळे आजघडीला धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. सातही धरणांची मूळ पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ असून आता धरणांत केवळ ७७ हजार ०५२ दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक आहे.

मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरीही धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. त्यातच सातत्याने खालावत चाललेल्या धरणांतील पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनुसार, आता भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठ्याने मुंबईकरांची तहान भागविली जात आहे.

हेही वाचा…ठाणे, पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

२० जून रोजीचा पाणीपुरवठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२०२४ – ७७,०५२

२०२३ – १,११,६७४
२०२२ – १,५१,२३८