सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमी पाटीलला दहीहंडीच्या निमित्ताने मुंबईत बोलवण्यात आलं होतं. मुंबईत गौतमी पाटील आली. आपल्याला मुंबईत येऊन खूप आनंद झाल्याचंही तिने सांगितलं. मात्र गौतमी पाटील आणि राडा यांचं एक समीकरणच झालं आहे. त्याचाच प्रत्यय मुलुंडमध्येही आला. मुलुंडमध्ये जेव्हा गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता तेव्हा तिथे एका तरुणाला जमावाने बेदम मारलं आहे. हा तरुण गौतमी पाटील नाच करत असताना स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत होता.
नेमकी काय घडली घटना?
गौतमी पाटीलने दही हंडीच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यात नृत्य करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. आपल्या उत्तम नृत्याने तिने चाहत्यांना घायाळ केलं. मुंबईतल्या मुलुंडमध्ये जेव्हा गौतमी पाटील आली तेव्हा ती नृत्य करत असताना एका तरूणाने स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांनी त्याला समजावलं, वर जाऊ नकोस असंही सांगितलं. तरीही तो स्टेजवर जाऊ लागला. मग तिथे असलेल्या जमावानेच त्याला बेदम चोप दिला.
या घटनेमुळे काही काळ वातावरण तंग झालं होतं. पोलिसांनी हस्तक्षेप करत स्टेजवर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि लोकांनी बेदम चोपलेल्या या तरूणाला कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि घरी पाठवलं. तोपर्यंत काही काळासाठी गौतमी पाटीलचा डान्सही थांबला होता जो नंतर सुरू झाला. आजवर गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की अनेक ठिकाणी राडे झाले आहेत. मात्र ती जेव्हा मुंबईत आली तेव्हाही असाच प्रकार पाहण्यास मिळाला.
हे पण वाचा- “आडनाव बदलायचा प्रश्नच नाही”, जेव्हा गौतमी पाटीलच्या वडिलांनी टीका करणाऱ्यांना दिलं होतं सडेतोड उत्तर
गौतमी पाटीलच्या नथीची चर्चा
गौतमी पाटीलने गुरुवारी मुंबईत येत असताना एक खास नथ घातली होती. या नथीवर गौतमी असं नाव लिहिलेलं होतं. याविषयी तिला विचारलं असता ही नथ माझ्या मैत्रिणीने मला भेट दिली आहे. आज दहीहंडी असल्याने कार्यक्रमात ही नथ मी घातली आहे असं तिने सांगितलं. गौतमीच्या या नथीचीही चर्चा मुंबईत झाली.
ठाण्यात गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी
ठाण्याल्या मागाठणे या ठिकाणी तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमातही गौतमीने डान्स केला. यावेळी तीन ते चार गाण्यांवर डान्स करत गौतमीने उपस्थितांची मनं जिंकली. गौतमी जेव्हा नाचत होती तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता.