मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं आपलं मुख्य कार्यालय आता मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधून निर्णय गतीने घेण्यास मदत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. १३ जुलैला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवलं जाणार आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेलें.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 20, 2021
तसेच, “महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही.” असा टोला देखील सचिन सावंत यांनी लगावलेला आहे.
Flash Mob Video : “मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद”
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. त्यानंतर १७ जुलैला प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी ‘मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद’ अशी कॅप्शन लिहून तिथे सुरू असलेल्या एका गरबाचा व्हीडिओ ट्विट केला होता. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी मास्क घालून गुजरातचं पारंपारिक नृत्य गरबा करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. हर्ष गोयंका हे आरपीजी इंटरप्रायझेसचे चेअरमन आहेत.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला स्थलांतरित
कोणती विमानतळं अदानी समूहाकडे?
अदानी ग्रुपकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.