इंद्रायणी नार्वेकर
मध्य मुंबईतील शिवडी येथील अभ्युदय नगरमध्ये भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडियाने मुंबईतील नवरात्री यंदा गाजवली. मनसेचा बोलबाला असलेल्या अभ्युदय नगरमध्ये हा दांडीया रंगल्यामुळे शिवसेनेपेक्षा मनसेच्या बालेकिल्ल्यालाच अधिक धोका असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
पालिकेची निवडणूक अपेक्षित असल्यामुळे सण व उत्सवाच्या आडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांकडून केला जातो आहे. त्यातच भाजपने शिवडीमध्ये मराठी दांडीयाचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे या कार्यक्रमाला मराठी रहिवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने दांडियाचा कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र अभ्युदय नगर परिसरात शिवसेनापेक्षा मनसेचा दबदबा अधिक असल्यामुळे धक्का नेमका शिवसेनेला की मनसेला अशाही चर्चा रंगल्या आहेत.
अभ्युदय नगर आणि जिजामाता नगर झोपडपट्टी या परिसरात एकूण सुमारे पन्नास नवरात्री उत्सव मंडळे असल्यामुळे या दांडियाला कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता होती. अभ्युदय नगरमध्ये साधारण साडेतीन हजार रहिवासी तर जिजामाता नगरमध्ये अडीच हजार रहिवासी आहेत. सुरूवातीला या दांडियासाठी पासची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नंतर सुरक्षारक्षक आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाल्यामुळ ही पासची पद्धत बंद करण्यात आल्याचे समजते.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्यासह प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आदी कलाकार गाणी म्हणतात. मुलुंडमधील आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात भूमिका बजावली आहे.
आयफोनचे आमिष ?
गर्दी जमवण्यासाठी भाजपने ७० हजाराच्या आयफोनचे आमिष दाखवले असल्याचीही चर्चा सुरू आहे. या दांडियासाठी दररोज दोन विजेत्यांना आयफोन दिले जात आहेत. एक महिला व एक पुरुष यांना हे फोन दिले जात आहेत. तसेच काही उत्तेजनार्थ बक्षीसेही दिली जात आहेत. त्याचबरोबर या दांडियामध्ये आतापर्यंत सलमान खान, रणवीर सिंग, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, सई ताम्हणकर अशा अभिनेते व अभिनेत्रींनीही हजेरी लावली आहे.
हा कार्यक्रम आम्ही निवडणूक डोळ्यासमोर केलेला नाही. हिंदू सण हे मोठ्या प्रमाणात, जोरदार साजरे झाले पाहिजेत. मराठी दांडिया हा प्रथमच शिवडीमध्ये झाला आहे, आणि लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे, अशी प्रतिक्रिया प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.