लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : कुर्ला येथील बस दुर्घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूक, वाढते फेरीवाले, रस्त्यावरून चालणारे पादचारी असे सगळेच विषय चर्चेत आले आहेत. मुंबईत कुर्ल्यासारखी गजबजलेली अनेक ठिकाणे असून दादर, बोरिवली, अंधेरी, वांर्द्यातील अनेक रस्त्यांची अवस्थाही दुर्घटना प्रवण म्हणावी अशी आहे. आधीच अरुंद असले रस्ते चिंचोळे होत चालले असून त्यावरून बेस्टच्या बस चालवणे जोखमीचेच झाले आहे. कुर्ल्यासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या सर्वांचा एकसंध विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षात मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या शहराचा पसाराही वाढू लागला आहे. अनियोजित वाढीमुळे शहर आणि उपनगरांत दुकानदारांनी आणि फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते, कुठेही, कशाही उभ्या असलेल्या गाड्या, अरुंद रस्त्यातून वाट काढत जाणाऱ्या बसगाड्या आणि मध्येच जीव मुठीत घेऊन चालणारे पादचारी हेच चित्र दिसते. त्यातही रेल्वे स्थानकांबाहेर या समस्या अधिकच असतात. कुर्ल्यासारखी अपघाताची भीषण दुर्घटना घडल्यानंतर हे सगळे विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. मुंबईतील सर्व प्रमुख स्थानकांच्या बाहेर भाजी बाजार भरत असून फेरीवाल्यांनीही आपले व्यवसाय थाटलेले आहेत. पाचशे मीटर परिसरापर्यंत फेरीवाले बसू नयेत हा नियम कागदावरच असल्याचे दिसते. रेल्वे स्थानकातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना लगेचच बस मिळावी म्हणून स्थानक परिसरात बसस्थानकेही आहेत. त्यामुळे या गर्दीतूनच बसगाड्यांना वाट काढत मार्गक्रमण करावे लागते. बहुतेक बसमार्ग हे स्थानकापर्यंत येऊन खंडित होतात. त्यामुळे प्रवासी उतरून नवीन प्रवासी गाडीत चढेपर्यंत बस तेथेच उभी असते, वळण घेते. त्यामुळे सायंकाळी स्थानकांबाहेर गर्दी, वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे.

आणखी वाचा-MVA : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेस-शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर!

याबाबत आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले की, आम्ही मोहीम घेऊन हे फेरीवाले हटवले आहेत. पालिकेचे पथक याठिकाणी रोज तैनात असते. मात्र पथक नसताना फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. त्यामुळे दिवसभर सुमारे २५ ते ३० जणांचे पथक, गाड्या या ठिकाणी तैनात ठेवाव्या लागतात. तसेच फेरीवाले हे आक्रमक होत असल्यामुळे पोलिसांचीही कुमक मागवावी लागते. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवणे मुश्कील होत असते. मात्र सध्या हे फेरीवाले हटवण्यात आले आहेत. आता बेस्टने या मार्गावरून बसगाड्या सुरू कराव्यात, असेही बेस्टला कळवण्यात आले आहे.

बसच्या लांबीचाही

  • गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बसमार्गावरील गाडीची लांबीही कमी असायला हवी असे मत बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केले आहे.
  • पूर्वी अशोक ले लॅण्ड कंपनीच्या बसगाड्यांची लांबी ही ११ मीटर होती. तसेच काही बस या ९ मीटर लांबीच्या होत्या. आता मात्र नव्याने आलेल्या गाड्यांची लांबी ही १२ मीटर आहे.
  • नवे तंत्रज्ञान समाविष्ट करण्यासाठी गाड्यांची लांबी वाढलेली आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी मोठी बस वळवणे हे देखील मोठे जोखमीचे काम असते. गर्दीमुळे गाडी चालवणे हे मोठे आव्हान बस चालकांसमोर मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर आहे.
  • बेस्ट बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून ती जिवंत राहिली पाहिजे. एखाद्या मार्गावर गर्दी असते म्हणून तो रस्ता बस वाहतूकीसाठी बंद करावा हे देखील योग्य नाही. फेरीवाल्यांचा प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत यावर कायमस्वरुपी तोडगा निघू शकत नाही.

बेस्ट चालकाची मद्यखरेदी

अंधेरी येथे कर्तव्यावर असताना ‘बेस्ट’ बसमधील चालक दारूखरेदी करतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. प्रसिद्ध झालेली चित्रफित अंधेरी येथील वर्सोवा भागातील असून गोराई डेपो ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक ‘ए – २५९’ बसगाडीतील आहे. बसगाडीत प्रवासी बसलेले असताना दारूचे दुकान येताच अचानक बस थांबवून चालकाने मद्याची बाटली विकत घेतल्याचे चित्रफितीत दिसत आहे.

आणखी वाचा-ॲक्युपंक्चर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची माहिती

मुद्दाफेरीवाल्यांमुळे बसमार्ग बंद

बोरिवली स्थानकाबाहेरच्या मार्केट गल्लीत गेल्या कित्येक वर्षांपासून फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली असून या मार्गावरून जाणाऱ्या बसगाड्यांचे मार्गही गेल्या सात आठ वर्षात बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. हा प्रश्न मानवाधिकार आयोगापर्यंत गेला आहे. फेरीवाल्यांमुळे बसगाड्यांचे मार्ग बदलल्याचे बेस्टने कबूल केले आहे. याबाबत मानवाधिकार आयोगाने फटकारल्यानंतर पालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयाने नोव्हेंबरमध्ये फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली व हा रस्ता मोकळा केला.

अंधेरीतही फेरीवालेच

काहीशी अशीच परिस्थिती अंधेरी कुर्ला मार्गावरही आहे. या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्याही खूप वाढलेली आहे. महानगरपालिकेने या मार्गावर तयार केलेल्या रुंद अशा पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्यावरच्या दोन मार्गिकाही फेरीवाल्यांनी व्यापल्या आहेत. १जे बी नगर येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. त्यावेळी याठिकाणी फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढत जाणेही कठीण होते. त्यावेळी रस्त्यावरून एकच गाडी जाऊ शकेल एवढाच रस्ता वाहतूकीसाठी शिल्लक असतो. त्यामुळे एखादी बस दुर्घटना याठिकाणीही होऊ शकते, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी व्यक्त केली आहे.

दादरमध्ये चालणेही कठीण

दादर स्थानक हे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. स्थानकाबाहेर फेरीवाले, फुलवाले, भाजीवाले, उभ्यानेच वस्तू विकणारे यांची प्रचंड गर्दी रोजच असते. या खरेदीसाठी आलेले लोक यांचीही मोठी गर्दी याठिकाणी असते. त्यातच स्थानक परिसरातून वरळीकडे बसगाड्या येतात. अत्यंत अरुंद अशा जागेतून ही बस स्थानक परिसरात येते. कुर्ल्यासारखी एखादी दुर्घटना घडल्यास दादरमध्ये त्याचे स्वरूप अतिशय भीषण असेल हे नक्की, असे मत सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी यांनी व्यक्त केले आहे. बेकायदा फेरीवाल्यांमुळे मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर चालणे मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danger of accident at every turn of road for mumbai citizens mumbai print news mrj