ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमधील विसंवादाचा सिलसिला कायम असून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सिडकोमार्फतच केला जाईल, अशी ताठर भूमिका घेत सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मंगळवारी पालकमंत्री गणेश नाईक यांना एक प्रकारे धक्का दिला. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत २.५ चटईक्षेत्र निर्देशांकाचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे अक्षरश: खेटे घालत असताना सिडकोमार्फत हा पुनर्विकास झाला पाहिजे, अशी भूमिका घेत हिंदूरावांनी नाईकांना घरचा आहेर दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
नवी मुंबईत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारने यासाठी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते जिवाचे रान करत आहेत. नवी मुंबई शहराचे नियोजन प्राधिकरण महापालिका आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे र्सवकश असे धोरण मंजूर करत त्यासाठी २.५ तर गावठाणांच्या विकासाकरिता चार चटईक्षेत्र निर्देशांकाचा एक प्रस्ताव महापालिकेने यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी सूचना, हरकती यांसारख्या कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे आणि पर्यायाने गणेश नाईकांचे पुनर्विकास धोरण सिडकोला मान्य नाही, असा अर्थ त्या वेळी काढण्यात आला होता. अजित पवार यांचे समर्थक प्रमोद हिंदूुराव हे सध्या सिडको अध्यक्षपदी आहेत. महापालिकेच्या धोरणाला सिडको खो खालत असतानाही बघ्याची भूमिका घेणाऱ्या हिंदूुरावांनी मंगळवारी सगळ्यावर कडी करत सिडको इमारतींचा पुनर्विकास सिडकोनेच करायला हवा, अशी भूमिका मांडत नाईकांच्या यासंबंधीच्या धोरणाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. कळंबोली, नवीन पनवेल येथील सुमारे २४ हजार घरांच्या पुनर्विकासाकरिता एकत्रित योजना (क्लस्टर) आखणे गरजेचे आहे. तसेच महापालिका हद्दीतील सिडकोच्या इमारती या सिडकोच्या जमिनीवर उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास सिडकोमार्फत व्हायला हवा, असे हिंदूुराव यांनी स्पष्ट केले. नाईकांच्या भूमिकेशी तुमची भूमिका सुसंगत नाही, अशी विचारणा करता पालकमंत्री आणि माझी भूमिका सर्वसामान्यांच्या हिताची आहे, अशी सारवासारवही केली. नवी मुंबई महापालिका हद्दीत अडीच चटईक्षेत्र दिल्यास तेथील पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही. तरीही जादा एफएसआय हवा असेल तर माझी हरकत नाही, असा टोलाही हिंदूुराव यांनी लागवला. सिडकोने पुनर्विकास करावा, अशी भूमिका मांडल्यानंतरही मी नाईकांच्या विरोधात नाही, हे वाक्य मात्र हिंदूुराव पुन्हा पुन्हा उच्चारत होते. उच्चारत होते.
महापालिका पुनर्विकास धोरणासाठी २.५ चटईक्षेत्र निर्देशांक मागत असली तरी सिडकोने यापूर्वीच या धोरणाला विरोध करत पुनर्विकासासाठी दोनपेक्षा अधिक चटईक्षेत्र निर्देशांक देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. अडीच चटईक्षेत्र निर्देशांकाचा भार पेलण्याची क्षमता नवी मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये नाही, अशी स्पष्ट भूमिका सिडकोने हरकती, सूचनांसाठी पूर्ण करण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान मांडली होती.
सिडको अध्यक्षांचा पालकमंत्र्यांना धक्का
ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमधील विसंवादाचा सिलसिला कायम असून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सिडकोमार्फतच केला जाईल
First published on: 09-10-2013 at 02:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous buildings of navi mumbai will be redeveloped by cidco pramod hindurao