विधान परिषदेच्या सभापतींनाच उद्देशून अपशब्द वापरल्याबद्दल शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांना शुक्रवारी सभागृहातून डिसेंबरअखेपर्यंत निलंबित करण्यात आले. सभ्यता व सुसंस्कृतपणा धाब्यावर बसवून रावते यांनी राजकारणातील ढासळत्या नीतिमूल्यांचे दर्शन घडवले असतानाच मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून शिवीगाळ करत असंस्कृतपणाची परिसीमा गाठली. दरेकर यांना जुलै २०१४पर्यंत निलंबित करण्यात आले असून दोन्ही सभागृहांतील एकेक सदस्य निलंबित होण्याची अशी पहिलीच घटना आहे.
सिंचनाच्या चर्चेवरून विधान परिषदेत गेले दोन दिवस निर्माण झालेल्या पेचावर मार्ग काढण्याकरिता सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रावते यांनी सभापतींना उद्देशून काही उद्गार काढले. सभापतींबरोबर झालेल्या शाब्दिक चकमकीच्या वेळी त्यांनी वापरलेली भाषा फारच वाईट होती, असे सांगण्यात आले. यामुळेच त्यांचे सदस्यत्व डिसेंबरअखेपर्यंत निलंबित ठेवण्याचा ठराव विधान परिषदेत करण्यात आला. मात्र, आपण सभापतींना उद्देशून काहीही अपशब्द काढले नव्हते, असा दावा रावते यांनी नंतर केला.
दुसरीकडे, विधानसभेत मनसेचे प्रवीण दरेकर यांच्यावरही हीच आफत ओढवली. मुंबईच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सर्वच सदस्यांना पुन्हा बोलायचे होते. पण उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी परवानगी नाकारताच विरोधक सभात्याग करीत असताना दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून शिवी देत अपशब्द काढले. ही बाब अमिन पटेल, बाबा सिद्दीकी, जितेंद्र आव्हाड या सत्ताधारी सदस्यांनी उपाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. दरेकर यांना जुलै २०१४ पर्यंत निलंबित करण्याचा ठराव सभागृहात करण्यात आला.
‘निलंबन मंत्री’ हर्षवर्धन पाटील!
दोन्ही सभागृहांमधील २९९ आमदारांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई झाली आहे. नासिकराव तिरपुडे यांच्यानंतर संसदीय कार्य हे खाते सर्वाधिक नऊ वर्षे हर्षवर्धन पाटील हे भूषवित आहेत. त्यांनी आतापर्यंत ६९ आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आहे. यामुळेच त्यांना निलंबन मंत्री म्हणून हिणविले जाते. आवाज दडपण्यासाठीच विरोधी सदस्यांचे निलंबन घडवून आणले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी केला.