एसटीमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची पुरेशी माहिती भरती प्रक्रियेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडेच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. १९७८९ पदांसाठी होत असलेल्या या भरतीप्रक्रियेच्या माहितीअभावाचा परिणाम एसटीच्या संकेतस्थळावरही जाणवत आहे. स्वाभाविकच महामंडळाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे लाखो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
‘महामंडळातील मोठी कामगार भरती’ असा गाजावाजा करत महामंडळाने ही प्रक्रिया सुरू केली. या भरतीमध्ये चालक, वाहक, लिपिक-टंकलेखक आणि सहाय्यक या पदांचा समावेश आहे. त्यानुसार सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. तरचार लाख उमेदवार लेखी परीक्षेला बसले. या परीक्षेचा निकाल २६ नोव्हेंबरला महामंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार असल्याचे महामंडळाने सांगितले होते. परंतु त्यापैकी सहाय्यक पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाच नाही. आणि तो केव्हा लागणार याचीही कुठली माहिती संकेत स्थळावर देण्यात आलेली नाही. कळस म्हणजे जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्या उमेदवारांसाठी पुढील सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत.
कोणत्या पदासाठी किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत, त्यापैकी किती जणांनी परीक्षा दिली आणि त्यातील किती जण उत्तीर्ण झाले याची काहीही माहिती महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार तर होत नाही ना, अशी संशयमिश्रीत चर्चा महामंडळातच रंगली आहे.
यासंदर्भात महामंडळाचे नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांची भेट घेतली असता ‘आपल्याकडे अपूर्ण माहिती आहे.’, असे  त्यांनीच सांगितले. महामंडळाचे संकेतस्थळ संपूर्ण मराठीमध्ये असताना परीक्षेच्या निकालाची यादी मात्र इंग्रजीत जाहीर करण्यात आली आहे.
याविषयी विचारले असता, त्यांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या अधिकाऱ्याला निकाल इंग्रजीत आहे का, अशी विचारणा केली. यावरूनच अधिकाऱ्यांजवळ भरतीसंदर्भात किती माहिती आहे याचा अंदाज येत होता.
पण काही तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या तात्काळ सुधारून उर्वरीत निकाल ३० नोव्हेंबरला लावला जाईल, असे उत्तर त्यांनी दिले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा