‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर झालेल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी शिवसेनेला परवानगी दिली. त्यामुळे यंदाही ‘शिवतिर्था’वर ‘विचारांचे सोने’ लुटण्याची संधी शिवसैनिकांना मिळणार आहे. मात्र, पुढील वर्षी शिवाजी पार्कऐवजी उपनगरातील एमएमआरडीएसारख्या अन्य मैदानांचा दसऱ्या मेळाव्यासाठी विचार करा, असेही न्यायालयाने शिवसेनेला बजावले आहे.
शिवाजी पार्क वर यंदाही दसरा मेळाव्याची परवानगी मागणाऱ्या शिवसेनेची विनंती पालिकेने फेटाळून लावली होती. त्याविरोधात शिवसेनेचे अनिल परब यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास परवानगी दिली. मात्र, मेळाव्यादरम्यान ध्वनिरोधक व्यवस्था, (साउंड बॅरिअर) मैदानाभोवती लावण्याचे, क्रिकेटच्या खेळपट्टय़ा सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. पुढल्या वर्षी मात्र अन्य मैदानांसाठी अर्ज करण्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यादरम्यान ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे मोठय़ा प्रमाणात उल्लंघन केल्याचा आरोप ‘वे-कॉम ट्रस्ट’ने केला. ‘आवाज फाउंडेशन’नेही गेल्या दोन वर्षांची ध्वनिप्रदूषणाची माहिती सादर केली. गेल्या ४० वर्षांपासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा भरत असून त्याला राजकीय आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच एक दिवस पार्क मेळाव्यासाठी देण्यास काहीच हरकत नसल्याचा युक्तिवाद शिवसेनेतर्फे अॅड्. व्ही. एम. थोरात यांनी केला. त्यावर न्यायालयाने परवानगी देण्यात येत असली तरी ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन होणार नाही हे ध्यानी ठेवण्यास बजावले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा