संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज मुंबईकडे आहे. मुंबईमध्ये आज दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलाय तर उद्धव ठाकरे हे दादरमधील शिवाजी पार्कवरुन पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळाव्यातून आपलं मत मांडणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांची उत्सुकता शिगेला पोहचेलली असतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी नवा टीझर शेअर केला आहे.
राज्यातील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, “मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचं तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” या कॅप्शनसहीत हा टीझर शेअर केला आहे. चला बीकेसी हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. हिंदुत्वाच्या सन्मानाचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दसरा मेळावा. आपल्या अभिमानाचा शिवसेनेचा दसरा मेळावा, असा मजकूर या टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे वारकरी, भांगडा करणारे पंजाबी बांधव, दाक्षिणत्य कला सादर करणारे कलाकार यासारखी दृष्य या टीझरमध्ये दिसत आहेत.
याशिवाय मुख्यमंत्री शिंदे हे गर्दीमधून लोकांना हात हालवून प्रतिसाद देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दुर्गामातेची मूर्तीही दिसत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या व्हिडीओला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे.