मुंबईत बुधवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदानात तर शिंदे गटाची बीकेसीमधील मैदानात सभा पार पडली. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार पोलिसांनी कोणाच्या सभेला जास्त गर्दी होती यासंबंधीची आकडेवारी दिली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?
शिवसेनेने २.५ लाख लोकांनी मेळाव्याला उपस्थिती लावल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे तीन लाख लोक शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित होते असं सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांच्या अंदाजानुसार उद्धव ठाकरेंच्या सभेला एक लाख तर एकनाथ शिंदेंच्या सभेला दोन लाख लोक उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार, तर बीकेसीमधील मैदानाची १ लाख क्षमता आहे.
विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?
शिंदेंच्या सभेतून लोकांचा काढता पाय?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुरुवात होताच ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी काढता पाय घेतला असा शिवसेनेचा दावा आहे. शिंदेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण अंतिम टप्प्यात पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अवघ्या पाऊण तासामध्ये आपंल भाषण संपवलं.
पश्चिम रेल्वेच्या डब्यांमध्ये लाईव्ह कव्हरेज
बुधवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना डब्यात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर शिंदे गटाच्या मेळाव्याचं लाईव्ह कव्हरेज दिसलं तेव्हा आश्चर्य वाटलं. आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर काही वेळातच हे कव्हरेज थांबवण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे. तसंच कंत्राटदाराकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. फक्त १० ते १५ मिनिटांसाठी हा कार्यक्रम लाईव्ह होता असा त्यांचा दावा आहे.
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला एका राजकीय पक्षाची सभा लोकलच्या डब्यांमध्ये लाईव्ह दाखवल्याची माहिती मिळाली. आम्ही यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती. आमच्या करारानुसार, राजकीय स्वरुपाची कोणतीही जाहिरात किंवा माहिती दाखवण्यास निर्बंध आहेत”.