शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये होत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मेळाव्यांमधील भाषणांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठच्या सुमारास भाषण करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असतानाच सुरुवातीच्या भाषणांमध्येच शिंदे गटातील नेत्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या भाषणांमधील संदर्भ देत केल्या जाणाऱ्या टीकेमध्ये उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आदित्य ठाकरे हे स्वित्झर्लंडला गेले होते असा टोला शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळेंनी लगावला आहे.
नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”
खासदारांचे प्रतिनिधी आणि लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते असणाऱ्या राहुल शेवाळेंनी शहाजीबापू पाटील यांच्यानंतर भाषण केलं. या भाषणामध्ये राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री हे रुग्णालयामध्ये असताना बंडखोर आमदारांनी पक्ष फोडण्याचा कट रचल्याची टीका आदित्य यांनी अनेक ठिकाणी केली. मागील तीन महिन्यांपासून आदित्य यांनी हे विधान अनेकदा केलं असून याच विधानावरुन शेवाळेंनी आदित्य यांना टोला लगावला.
नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”
“आमच्यावर आरोप झाले की, बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडला. बाबा आजारी अशताना पक्ष सोडून जाण्याचे कारस्थान रचले जात होते. जेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा टीका करणारे स्वत: (आदित्य ठाकरे) स्विझर्लंड येथे व्यापारी परिषदेला गेले होते. त्यांचा विभाग नसताना ते गेले होते,” असं शेवाळे म्हणाले.
नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”
“जेव्हा जून महिना यायचा तेव्हा ठाकरे इंग्लंडला जायचे. आम्ही इथे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असायचो,” असा टोलाही शेवाळेंनी लगावला. “मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला,” असा टोलाही शिवसेनेच्या लोकसभा गटनेत्यांनी लगावला.
नक्की वाचा >> Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मे महिन्यामध्ये तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाईंबरोबरच तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंही गेले होते. याच मुद्द्यावरुन शेवाळेंनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली. शिंदे समर्थक ३९ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंनी २९ जून रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपाच्या समर्थनाने शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.